‘त्या’ भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयिताला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:08+5:302021-05-26T04:15:08+5:30
पंचवटी : पाच वर्षांपूर्वी मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगरमध्ये झालेल्या भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयितास पंचवटी पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथून ...
पंचवटी : पाच वर्षांपूर्वी मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगरमध्ये झालेल्या भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयितास पंचवटी पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथून सोमवारी अटक केली आहे. तब्बल पाच वर्षांनी या गुन्ह्यातील एकविसावा संशयित जेरबंद झाला असून, रवींद्र दगडूसिंग परदेशी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पाच वर्षांपूर्वी क्रांतीनगर येथे भेळभत्ता विक्री करणारे हेमंत रामदास वाघ व त्याचा भाऊ सुनील रामदास वाघ या दोघांवर पूर्ववैमनस्यातून जमावाने हल्ला केला होता. त्यात सुनील वाघचा मृत्यू झाला होता, तर हेमंत गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी एकूण वीस संशयितांना बेड्या ठोकल्या तसेच त्यांच्यावर मोक्का लावला. खुनाच्या घटनेपासून रवींद्र परदेशी फरार होता. पोलिसांनी अनेकदा त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.
काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना परदेशी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथे त्याच्या तीन पत्नीसमवेत राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जोरण गाठले. परदेशी गावात असल्याची खातरजमा होताच पोलीस कर्मचारी घनश्याम महाले हे त्याच्यावर तीन दिवस पाळत ठेवून होते. काल सोमवारी परदेशी जोरण येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळताच त्याला शिताफीने अटक केली.
या गुन्ह्यात परदेशी याच्यासह त्याच्या दोन मुले, पुतण्या आणि एकवीस संशयित असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. परदेशीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
इन्फो...
भेळभत्ता विक्रेते वाघ बंधू व संशयित यांच्या पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. त्यातून संशयितांनी त्यांचा वचपा काढण्याच्या हेतूने लाठ्याकाठ्या, धारदार शस्त्र तसेच दगडाने खून केला होता. या गुन्ह्यात अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश असून, त्यापैकी काही जामिनावर बाहेर आहेत, तर मुख्य संशयित कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.