फरार संशयित सागर जाधवला अटक
By admin | Published: July 14, 2017 05:58 PM2017-07-14T17:58:44+5:302017-07-14T17:58:44+5:30
जळगाव जिल्ह्यातून घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पेठरोडवरील नवनाथनगर परिसरात राहणाऱ्या किरण निकम (३०) या युवकाच्या खून प्रकरणात मागील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित सागर जाधवला पंचवटी पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव शिवडी येथून अटक केली आहे. निकम खून प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
निकम खून प्रकरणात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित संतोष उघडे याला दोन दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले होते, त्यानंतर शुक्र वारी ( दि. १४) रात्री जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मे महिन्यात किरण निकम याची पूर्ववैमनस्यातून संशयित आरोपी संतोष उघडे, सागर जाधव, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व संतोष पगारे यांनी नवनाथनगरला भरवस्तीत धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेनंतर पाचही संशयित आरोपी फरार झाले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती, तर संतोष उघडे व सागर जाधव हे दोन संशयित फरार झाले होते. काही दिवसांपासून पोलीस जाधव व उघडेच्या शोधात होते. त्यातच काही दिवसांपूर्वी उघडेच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर झळकले होते. फरार संशयित आरोपी उघडे याच्याबाबत वरिष्ठ पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून उघडे याला रात्री ताब्यात घेतले, तर जाधव हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव शिवडी परिसरात असल्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. बी. जगदाळे, प्रवीण कोकाटे, महेश साळुंके, सुरेश नरवडे, संतोष शेळके, विलास चारोस्कर आदी पंचवटी पोलिसांचे पथक जळगाव येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने जाधव याला बेड्या ठोकून पंचवटी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.