हजार कोटींचा गंडा घालून फरार ठगाला बेड्या, 120 कोटींचं होतं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:16 AM2022-03-28T10:16:54+5:302022-03-28T10:17:27+5:30
तिवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने वावरत होता
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची १ हजार कोटींची फसवणूक करून गेल्या सात वर्षांपासून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारी याला उत्तर दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट स्कॅाडने (एएटीएस) शनिवारी नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या.
तिवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने वावरत होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. २०११ पासून बांधकाम व्यवसायाला पुनीतने सुरुवात केली. २०१८ पर्यंत त्याने १५ ते २० लहान व ८ मोठ्या कंपन्या सुरू केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या मयूर विहार, आनंद विहारसह विविध पोलीस ठाण्यांत, तसेच उत्तर प्रदेशच्या नोएडा, सूरजपूर, तसेच पंजाबच्या अमृतसर शहरासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये मिळून सुमारे ३७ फसवणुकीचे गुन्हे पीयूषवर दाखल आहेत.
दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते. तो सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यात मिळाले १२० कोटींचे घबाड
पीयूष तिवारी याच्या घरावर प्राप्तीकर विभागाने २०१६ रोजी छापा टाकला होता. यावेळी त्याच्याकडे १२० कोटींचे घबाड आढळले होते. त्यानंतर पीयूषने दिल्ली एनसीआरमध्ये फ्लॅट, प्लॉटस् विक्रीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली. दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी पीयूष तिवारी याने मिळविली आहे. तो मूळ उत्तर प्रदेशातील नोएडाचा आहे.