भगूर गावात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
By admin | Published: November 30, 2015 11:18 PM2015-11-30T23:18:58+5:302015-11-30T23:19:32+5:30
भगूर गावात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
भगूर : गावामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, दुचाकी वाहनचालकांच्या मागे मोकाट कुत्री लागत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.
भगूर गावच्या गल्लीबोळात मोकाट, उपद्रवी कुत्र्यांची संख्या वाढली असून यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदिंना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले आहे. तर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या मागे लागत असल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्याला रस्त्याने पायी जाणे मोकाट कुत्र्यांमुळे अवघड होऊन बसले आहे. भगूर नगरपालिकेचा मोकाट कुत्र्यांना पकडून गावाबाहेर लांब सोडून देण्याचा ठेका बंद झाल्याने कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तसेच आजाराने जखमी झालेले, पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे. भगूर नगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयानुसार पिसाळलेल्या व जखमी आजारी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच मोकाट कुत्र्यांना पकडून गावाबाहेर लांब सोडावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)