मताधिक्य मिळाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:09 AM2019-05-25T01:09:03+5:302019-05-25T01:09:20+5:30
विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत युतीच्या पाठीशी राहिलेल्या सिडको, सातपुरचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदाही सेनेचे हेमंत गोडसे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले
विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत युतीच्या पाठीशी राहिलेल्या सिडको, सातपुरचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदाही सेनेचे हेमंत गोडसे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले असून, राष्टवादीचे समीर भुजबळ यांना अवघ्या ४० हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे. या मतदारसंघाने सातत्याने युतीची पाठराखण केल्याचे आजवरच्या निवडणूक निकालाने स्पष्ट झाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सेना व भाजपात मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळावा यासाठी रस्सीखेच होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात एकत्रित प्रचार केल्याचे दिसले नसले तरी, प्रत्येक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्याने आपापल्या भागात गोडसे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. त्यातही ज्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले त्यांचाच यात अधिक पुढाकार होता. सध्या विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाच्या आमदार सीमा हिरे करीत असून, येत्या निवडणुकीतही त्याच भाजपाच्या उमेदवार असतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा असला तरी, भाजपातच हिरे यांच्याऐवजी अन्य पदाधिकारीही उमेदवारीसाठी दावेदारी करीत असून, त्यांनीदेखील गोडसे यांच्या विजयासाठी हिरीरीने प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन आपली आगामी तयारी करून ठेवली आहे. भाजपात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार हे स्पष्ट दिसत असले तरी, सेनेनेदेखील हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न चालविले असल्याचा दावा सेनाइच्छुकांकडून केला जात आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी
या मतदारसंघासाठी शिवसेनेंतर्गतच चारपेक्षा अधिक दावेदार आहेत. एकाला पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द, दुसºयाचे संपर्कमंत्र्यांशी जुळलेले संबंध तर तिसरीकडे सरचिटणीसांचे निकटवर्तीय असे एक ना अनेक उमेदवार शिवसेनेकडून इच्छुक आहेत. भाजपातही अशीच स्थिती आहे. त्यात भाजपाच्या दावेदारांची संख्या पाहता, अर्धाडझन इच्छुकांची मनधरणी करण्यात सेना व भाजपाची कसोटी लागणार आहे. यंदा लोकसभा निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम ठरल्याने विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेऊन सर्वच इच्छुकांनी निवडणुकीसाठी काम केले. पक्षासाठी केलेल्या कामाचा पुरावा दाखवून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युतीत ही परिस्थिती असताना कॉँग्रेस आघाडीला मिळालेले मताधिक्क्य पाहता विधानसभा निवडणुकीत आघाडीला विजयासाठी कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मतदारसंघात कामगार व नोकरदारांचा भरणा असून, भौगोलिकदृष्ट्या विचार करता खांदेश व कसमा पट्ट्यातील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना भावणारा उमेदवारच त्यांचे प्रतिनिधीत्व करू शकतो. विशेष म्हणजे, या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्टÑवादीचे अस्तित्व कमी आहे. निवडणुकीसाठी मोजक्याच उमेदवारांची नावे चर्चित आहेत. त्यामुळे संघटन वाढविणे हा आघाडीसमोर पर्याय आहे.