आरोग्य केंद्रांना मिळणार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:07 PM2019-07-15T16:07:26+5:302019-07-15T16:07:41+5:30
रुग्णांना मिळणार दिलासा : बीएएमएस डॉक्टर्स उपलब्ध होणार
जायखेडा : जिल्हयातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस अर्हताप्राप्त वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रु ग्णांची होत असलेली हेळसांड रोखण्यासाठी १०४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांनी दिली.
जिल्हयात १०४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. यासाठी २०८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असूनही केवळ ७४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अवलंबून आहे. त्यामुळे रु ग्णांना उपचार घेतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी अभावी जिल्ह्यातील रु ग्णांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रु ग्णालये, अथवा मुंबई, पुण्यातील शासकीय रु ग्णालयांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक-यांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी ग्रामीण भागातून वारंवार करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हयातील वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त पदांबाबत आरोग्य सभापती यतीन पगार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन रु ग्णाची होत असलेली हेळसांड व गैरसोय लक्षात आणून दिली. त्यानंतर भुजबळ यांनी याप्रश्नी आरोग्यमंत्र्यांची तातडीने भेट घेऊन बीएएमएस अहर्ता धारक वैद्यकीय अधिका-यांची नेमणुक करण्याची मागणी केली. यास आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एमबीबीएस धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झालेल्या आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस धारक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याने ग्रामीण रु ग्णांना तत्पर व योग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.