त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 04:38 PM2019-09-06T16:38:12+5:302019-09-06T16:41:25+5:30
ग्रामसेवकांचा संप : ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना दाखल्यांची प्रतीक्षा
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात १२४ गावांचा कारभार पाहणाऱ्या ८४ ग्रामपंचायतींचे कामकाज ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यापासून ते ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ८४ ग्रामसेवक कामकाज पाहतात. तथापि गत १५ दिवसां पासून ग्रामसेवकांचा संप सुरु असल्याने या भागातील आदिवासी ग्रामपंचायतींची विविध विकास कामे ठप्प झाली आहेत. विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मिळत नसल्यामुळे लोकांची सरकारी कामे अडली आहेत. विकास कामांसाठी आलेला निधी विशिष्ट कालावधीत खर्च होणे अपेक्षित असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागु होईल. त्यापुर्वीच कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरु होणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामपालिकांच्या एकूणच कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात प्रशासकीय सेवेत ग्रामसेवक हा महत्वाचा घटक मानला जातो. परंतु, त्यांनी पुकारलेल्या संपामुळे अडचणीत भर पडली आहे.
पंचनामे कोणाच्या मदतीने करणार?
ग्रामसेवकांच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील विकास खुंटला असून त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतआहे. पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान पोहोचलेल्या शेतीचे पंचनामे करण्यास ग्रामसेवकच उपलब्ध नाही तर पंचनामे कोणाच्या मदतीने करणार?
- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी