कार्यकर्त्यांचा फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:46 AM2018-05-05T01:46:39+5:302018-05-05T01:46:39+5:30
नांदगाव : छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त येथे दुपारी ३च्या सुमारास येऊन धडकताच भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला.
नांदगाव : छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त येथे दुपारी ३च्या सुमारास येऊन धडकताच भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. आमदार पंकज भुजबळ यांच्या येथील कार्यालयासमोर भुजबळांचे शेकडो समर्थक जमले व त्यांनी भुजबळांच्या नावाचा जयजयकार केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी अखेर भुजबळांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रि या व्यक्त केली. काही महिने आधी शनि मंदिरासमोरच्या बागेत भुजबळांना जामीन मिळावा यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यासाठी तालुक्यातील भाजपा, शिवसेना, माकपा, राष्ट्रवादी, कॉँग्रेस व सामाजिक संघटनांनी एकमुखी आवाज उठवला होता. याची आठवण गुप्ता यांनी केली. ते जामिनावर सुटले. भविष्यात निर्दोष सुटतील, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी दिली. वटार : येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला. शुक्रवारी सकाळपासून गावात जेथे जेथे लग्न समारंभ होते तेथे भुजबळ यांच्या जामिनावर चर्चा होत होती. यावेळी माजी सरपंच प्रशांत बागुल, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, विठ्ठल खैरनार, मधुकर गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, योगेश बागुल व कार्यकर्ते उपस्थित होते. नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तब्बल दोन वर्षापासून जेलमध्ये ठेवल्याने भुजबळांवर शासनाने सूडबुद्धीने कारवाई केल्याचे भुजबळ समर्थकांमध्ये बोलले जात होते. नायगाव येथे राष्ट्रवादीचे मोहन कातकाडे, जोगलटेंभीचे सरपंच शशिकांत पाटील, आशिष फुलसुंदर, प्रभाकर जेजुरकर, सुदाम कमोद, बाळासाहेब केदार आदींसह भुजबळ समर्थकांनी येथील बसस्थाकासमोर आनंद उत्सव साजरा केला.