ऑक्सिजन प्लांटसाठी उभारला ४५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:10+5:302021-04-27T04:16:10+5:30
नाशिक : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ...
नाशिक : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी ४५ लाखांचा निधी जमवला आहे. नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेने त्यासाठी पुढाकार घेत तत्काळ या प्रकल्पासाठी अहमदाबादच्या एका कंपनीला ही ऑर्डर दिली असून, येत्या रविवारपर्यंत हा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहणार आहे.
नाशिकचा सर्वाधिक तातडीचा प्रश्न हा ऑक्सिजन पुरवठ्याचा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांचे प्राण ऑक्सिजन बेडअभावी जात आहेत. तसेच काही रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन बेडची सुविधा असूनही तिथे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांनादेखील प्रवेश मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या या तीन संघटनांनी मिळून काही भरीव कार्य करण्याचा निर्णय घेऊन महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नाशिक शहराला एका ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचीच गरज असून, ऑक्सिजनचा पुरवठा नित्यनेमाने होण्याची आवश्यकता असल्याचे या तिन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मिळून तत्काळ ४५ लाख रुपयांचा निधी उभारला. हा निधी तत्काळ अहमदाबादच्या एका ऑक्सिजन निर्मिती कंपनीला देऊन त्यांना तत्काळ प्लांट उभा करुन देण्यास सांगितले. त्या कंपनीनेही तातडीची गरज लक्षात घेऊन आठवडाभरात प्रकल्प उभारणीची तयारी दाखवली आहे. या प्रकल्पासाठी अशोक कटारिया, प्रशांत पाटील, उमेश राठी, नदीम शेख, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा, अरविंद कुलकर्णी, ऋषिकेश वाडेकर, अमर ठाकरे, कैलास पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
इन्फो
सोमवारपासून दररोज ६८ सिलिंडर ऑक्सिजन
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संबंधित कंपनीने कामकाजाला प्रारंभदेखील केला आहे. सर्व यंत्रणेसह सज्ज ऑक्सिजन प्लांट उभारणीला प्रत्यक्षात शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच रविवारपर्यंत प्रकल्प उभारणी पूर्ण करत सोमवारपासून दररोज किमान ६८ ऑक्सिजन सिलिंडर्स या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहेत. त्यातून दररोज किमान १०० माणसांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे होऊ शकणार आहे.
कोट
हा प्लांट सेल्फ जनरेटेड ऑक्सिजन निर्माण करणार असल्याने ज्या रुग्णालयात तो लागेल, तिथे बाहेरुन पुन्हा-पुन्हा ऑक्सिजन मागवण्याची गरजच राहणार नाही. शहरातील ऑक्सिजनची समस्या काही प्रमाणात तरी कमी करण्यात या प्रकल्पामुळे मदत होऊ शकणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तिन्ही संघटनांनी मिळून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
- डॉ. प्रशांत पाटील