ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी ५४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:50+5:302021-03-31T04:14:50+5:30
जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना प्रकल्पांतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सिन्नर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या टाकेद गटातील श्रीक्षेत्र सर्वतीर्थ ...
जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना प्रकल्पांतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सिन्नर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या टाकेद गटातील श्रीक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद आणि खेडभैरव येथे ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद येथे मंदिर परिसरात पाणीपुरवठा व्यवस्था व मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सात लाखांचा निधी मंजूर झाला आहे, तर सर्वतीर्थ टाकेद येथील श्रीराम मंदिराच्या परिसरातील विद्युतीकरण करणे व सौर पथदीप बसविण्यासाठी आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय खेड येथील भैरवनाथ मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण क्षेत्रात ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सोमठाणे येथे वज्रेश्वरी मंदिराचे वाहनतळ व आनुषंगिक कामे करण्यासाठी आठ लाख रुपये, धारणगाव येथे खंडेराव मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे यासाठी आठ लाख रुपये, पंचाळे येथे कानिफनाथ मंदिर परिसर सुधारणा आणि आनुषंगिक कामे करण्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कळविले आहे.