रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:40 PM2018-08-19T22:40:57+5:302018-08-20T00:46:19+5:30
खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार जे. पी. गावित यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कळवण : खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले असून, त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी भागातील वरखेडा ते शृंगारवाडी या रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार जे. पी. गावित यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मार्च २०१९ अखेर तालुका खड्डे मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भागातील न जोडलेली गावे आणि लोकवस्त्या बारमाही रस्त्यांव्दारे जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या; परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जावाढीसाठी व वाड्या-वस्त्यांसाठी रस्त्यांची नवीन जोडणीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कळवण तालुक्यातील रस्ते विकासकामांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वरखेडा- करंभेळ-दळवट-जामले-दरेगाव- तताणी- शृंगारवाडी या रस्त्यांच्या विकासकामांसाठी सात कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले असल्याने या रस्त्यांच्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शैलेश पवार व पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ गायकवाड यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे आमदार गावित यांनी यावेळी सांगितले.
कळवण तालुक्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाळा संपल्यानंतर आदिवासी सार्वजनिक
बांधकाम विभागाकडून संबंधित तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामास गती देऊन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना आमदार जे.पी. गावित यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, हेमंत पाटील, रघुनाथ खांडवी, अॅड. भाऊसाहेब पवार, बाळासाहेब गांगुर्डे, मधुकर पाटील, टीनू पगार, अतुल पगार, रशीद शेख, शिवाजी वळीणकर, दामू पवार, किरण शिरसाठ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.