पीककर्ज वाटपासाठी निधी द्या
By Admin | Published: September 9, 2016 01:02 AM2016-09-09T01:02:50+5:302016-09-09T01:03:36+5:30
जिल्हा बॅँकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे : शेतकऱ्यांनीही दिले निवेदन
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेतकरी सभासदांना अल्पमुदत पीककर्ज वाटपासाठी तसेच पुनर्गठन केलेल्या व नवीन शेतकरी सभासदांना कर्जवाटपासाठी राज्य सरकारने तत्काळ जाहीर केलेले साडेचारशे कोटींचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
स्वामी नारायण मंदिरात शहर भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीनंतर जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा बँकेच्या वतीने निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बॅँकेच्या वतीने २१२ शाखांमार्फत शेतकरी सभासदांना कर्जवाटप करण्यात येते. यंदाच्या हंगामात जिल्हा बॅँकेला १२५७ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. तसेच रब्बीसाठी ३१७ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.
खरिपात उद्दिष्टांपेक्षा जास्तीचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. वाढीव पीककर्ज वाटपासाठी ४५० कोटींचे अनुदान जिल्हा बॅँकेने सरकारकडे मागितले आहे. तसेच पुनर्गठण केलेल्या कर्जाची ४७ कोटींचे अनुदानही शासनाकडे प्रलंबित आहे.
त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी जिल्हा बॅँकेकडे निधी नसल्याने शासनाने जाहीर केल्यानुसार जिल्हा बॅँकेला ४५० कोटींचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नरेंद्र दराडे यांनी केली. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)