कॅन्टोन्मेंट बोर्डांना पहिल्यांदाच निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 08:53 PM2020-06-04T20:53:36+5:302020-06-05T00:23:32+5:30
देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास ९३ लाख २३ हजार ८३५ रुपये अनुदान मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निधी प्राप्त झाला आहे.
देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास ९३ लाख २३ हजार ८३५ रुपये अनुदान मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निधी प्राप्त झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून वित्त आयोगाचा लाभ कॅन्टोन्मेंट बोर्डास मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून प्रयत्न होत होते. कॅन्टोन्मेंट कायदा-२००६नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे कटक मंडळांनादेखील केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा अशी तरतूद केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी वित्त आयोगाचा लाभ कायद्याप्रमाणे मिळावा, अशी मागणी केली होती. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाकडून चालू आर्थिक वर्षातील एक लाख लोकसंख्या आतील गटासाठी मूलभूत अनुदानाचा पहिला अंतरिम ३०५ कोटी सर्व पात्र ‘ड’ वर्ग महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती व कटक मंडळांना लोकसंख्या तसेच क्षेत्रफळ या निकषांच्या आधारावर निधी देण्यात आला आहे. सदर अनुदानातून चालू वित्तीय वर्षात विकासकामांसाठी खर्च करायाचा आहे.
----------------------------------
विकासकामांना लागणार हातभार
देवळालीसह राज्यातील ७ कटक मंडळांना हा निधी प्राप्त झाला आहे. त्यात देवळाली (९३, २३, ८३५), अहमदनगर (४६, ४३, १०६), देहूरोड पुणे (८४, १६, ७१९), खडकी, पुणे (१, ०५, १५, ८२८), औरंगाबाद (२९, ८२, ७१४), नागपूर, कामटी (२३, ७३, ७९०), पुणे कॅन्टोन्मेंट (१, ०६, ७७, १२०) यांचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना वित्त आयोगाकडून काही प्रमाणात का होईना विकासकामांना हातभार लागला जाणार आहे.
--------------------------------
इतिहासात प्रथमच कटक मंडळांचा समावेश केंद्रीय वित्त आयोगात होऊन त्यांच्या शिफारसीनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषावर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास पहिल्या टप्प्याचा निधी रुपये ९३ लाख उपलब्ध झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड शिष्टमंडळाने यासंदर्भात तीनवेळा बैठका घेतल्या होत्या. विद्यमान राज्य सरकारनेही याकामी तत्काळ निर्णय घेतल्याने हे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून सर्व वॉर्डातील विकासकामांना खर्च केला जाणार आहे.
- भगवान कटारिया, उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली