त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजनेच्या कामांना निधीचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 11:13 PM2021-09-27T23:13:25+5:302021-09-27T23:14:23+5:30
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत.
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत.
याशिवाय या कामांना केंद्र सरकारकडून येणारा निधीही थांबविण्यात आल्याने ही योजना बंद पडते की काय, अशी भीतीही निर्माण झाली होती. आता कोरोनामुळे बंद करण्यात आलेली कामे केव्हाच सुरू झाली आहेत, मात्र त्र्यंबकेश्वर, अंजनेरीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ही कामे निधीअभावी रखडल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील अभियंता महेश बागुल यांनी निधी प्राप्त होताच काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने भारतातील आठ तीर्थक्षेत्रांचा विकास प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरवले. त्यात महाराष्ट्रातील एकमेव तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन वाढावे, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, जीर्ण पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दार व्हावा. पुरातन मंदिरांचे गतवैभव त्यांना पुन्हा मिळवून द्यावे व त्यांचे पुरातत्व जपावे या सदहेतूने केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी दि.१६ ऑगस्ट २०१६ रोजी देशातील फक्त आठ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 'प्रसाद' योजनेअंतर्गत विकास करण्याची घोषणा करत केंद्रीय पर्यटन विभागांतर्गत मंजुरीही दिली होता. त्यात महाराष्ट्रातील एकमेव त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरचा विकास करण्याबरोबर अंजनेरी येथील पुरातन हेमाडपंती जैन मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचे कामदेखील करण्यात येत आहे. यासाठी सन २०१४-१५ च्या अंदाजपत्रकामध्ये तशी तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी गोव्यातील एक प्रतिथयश वास्तुविशारद एजन्सीजचे मिलिंद रमाणी यांना काम देण्यात आले आहे.
१५ पैकी केवळ दोन कामे पूर्ण
त्र्यंबकेश्वर येथील कामे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या अखत्यारित व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होती. त्र्यंबकेश्वरची कामे नाशिकच्या स्पेक्ट्रम कन्स्ट्रक्शन्स या बांधकाम करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे. मात्र एकूण १५ कामांपैकी फक्त दोन कामे पूर्ण झाली आहेत, तर १३ कामांपैकी काही कामे अर्धवट आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानची कामे पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून थांबविण्यात आली होती. आता मात्र परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास नाशिक पर्यटन विभागाचे महेश बागुल यांनी व्यक्त केला.
या आठ तीर्थक्षेत्रांचा होणार विकास
गुजरातमधील सोरटी सोमनाथ, जम्मू-काश्मीरमधील हजरतबल, झारखंडमधील देवघर, मध्य प्रदेशातील उज्जैन, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, उत्तर प्रदेशातील अयोध्या, पश्चिम बंगालमधील बेलूर ही आठ तीर्थक्षेत्र प्रायोगिक विकासकामांसाठी निवडण्यात आली आहेत.