ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास मिळणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:57 PM2020-12-28T20:57:15+5:302020-12-29T00:07:38+5:30
दिंडोरी : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत, बिनविरोध केल्यास एका महिन्याच्या आत गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला २५ लाख व ५ हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी गाव मागेल, त्या कामासाठी देण्यात येईल, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली.
ठळक मुद्दे झिरवाळ : एकोपा राहण्यासाठी निर्णय
तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असावा व गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ४ जानेवारीला माघारी असून, तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, तेथील ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात. यानिमित्ताने गावातील गट-तट न राहता सर्वजण एकसंघ राहतील.