जवान शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:10 AM2021-12-16T01:10:38+5:302021-12-16T01:11:20+5:30
येवला शहरातील विठ्ठलनगरातील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील हवालदार संदीप अर्जुन शिंदे यांचे कुपवाडा, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. १३) निधन झाले. जवान शिंदे यांचे पार्थिव बुधवारी शहरात दाखल झाले. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
येवला : शहरातील विठ्ठलनगरातील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील हवालदार संदीप अर्जुन शिंदे यांचे कुपवाडा, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. १३) निधन झाले. जवान शिंदे यांचे पार्थिव बुधवारी शहरात दाखल झाले. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि बहीण असा परिवार आहे.
जवान शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारतमाता की जय, अमर रहे - अमर रहे... संदीप शिंदे अमर रहे अशा घोषणा देत शहरवासीयांनी त्यांना अंतिम निरोप दिला. तहसीलदार प्रमोद हिले यांच्या उपस्थितीत नाशिक ग्रामीण पोलीस दल व येवला शहर पोलिसांच्या वतीने जवान शिंदे यांना बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.
श्रद्धांजलीच्या सभेत बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे, आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारप्रसंगी तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकारी यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.