शहीद केशव गोसावी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:18 PM2018-11-12T22:18:49+5:302018-11-12T22:26:17+5:30
सिन्नर (नाशिक) : पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगिर गोसावी यांच्यावर आज रात्री ...
सिन्नर (नाशिक) : पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगिर गोसावी यांच्यावर आज रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनाद्वारे त्यांचे पार्थिव शिंदेवाडी येथे आणण्यात आले. केशव यांचे पार्थिव घरी येताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सजविलेल्या रथातून केशव यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, केशव गोसावी अमर रहे ! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर सडासंमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. स्मशानभूमी परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.
अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, अनिल कदम, प्रांत महेश पाटील, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, राहुल आहेर, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, सहाय्यक निरीक्षक मोतीलाल वसावे, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी व शासकीय अधिकारी यांनी गोसावी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.