जवान विजय सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:00 PM2018-12-19T16:00:04+5:302018-12-19T16:00:30+5:30
डांगसौंदाणेवर शोककळा : ‘अमर रहे’च्या घोषणा देत अखेरचा निरोप
डांगसौदाणे : ‘अमर रहे,अमर रहे विर जवान विजय सोनवणे अमर रहे....’.‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’...अशा घोषणा देत डांगसौंदाणे येथील नागरिकांनी भुमिपूत्र लष्करी जवान विजय सोनवणे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. विजय सोनवणे (वय ३३) यांचा आसामच्या तेजपूर भागात सोमवारी (दि.१७)कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.
मंगळवारी (दि.१८) रात्री उशिरा विजयचे पार्थिव डांगसौंदाणे येथे आणण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी गावातील आठवडे बाजार, व्यापारी पेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत विजय सोनवणे यांच्या अंतिम संस्कारासाठी बाजार आवारतील मुख्य पटांगणात फुलांनी सजविलेला चबुतरा बांधून तयारी ठेवली होती. अंत्यसंस्कारापूर्वी विजय यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विजय यांची पत्नी खुशाली, आई-वडील, त्यांची अवघी ४ वर्षाची मुलगी अनुष्का आणि १३ महिन्यांचा मुलगा वृषभ या सर्वांचा आक्र ोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. फुलांनी सजविलेल्या रथातून विजय यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अंतिम दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती तर प्रत्येक घरासमोर विजय यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. अंत्यसंस्कारप्रसंगी सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, श्री.स्वामी समर्थ विद्याप्रसारकचे अध्यक्ष सुरेश वाघ,कैलास बोरसे,मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे, जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे, उपसरपंच विजय सोनवणे,डॉ. सुधीर सोनवणे, पंकज बधाण,अंबादास सोनवणे,पंढरीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रभारी पोलिस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, आसाम तेजपुरहून आलेले नायक सुभेदार गोरख कोरडे, नायक सुभेदार उत्तम सेंडगे,नायक कृष्णा सोनवणे, दादा जाधव, संपत चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसिलदार प्रमोद हिले, ग्रामपंचायत सरपंच जिजाबाई पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.