अंत्यविधीदेखील होतोय दुरूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:52+5:302021-04-17T04:13:52+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यात रुग्णालयात बेड मिळत नसल्याने उपचाराअभावी अनेक रुग्ण दगावत असल्याने मृत्युदरात वाढ होताना दिसून येत आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यात रुग्णालयात बेड मिळत नसल्याने उपचाराअभावी अनेक रुग्ण दगावत असल्याने मृत्युदरात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे सिडकोतील मोरवाडी, उंटवाडी, कामटवाडे, पाथर्डीगाव, अंबड येथील अमरधाममध्ये असलेल्या बेडच्या क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह अंत्यविधीसाठी येत आहेत. पहिल्यापेक्षा अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण दुप्पट असल्याने अक्षरशः नंबर लावावे लागत आहेत. तर काही वेळा बेडच्या बाजूला सरण रचून त्यावर अंत्यसंस्कार उरकून घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या महामारीने दिवसभरात तब्बल ३० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
सद्य:स्थितीत सिडको भागातील मोरवाडी चार, उंटवाडी दोन, अंबड दोन, कामटवाडे दोन, पथर्डीगाव दोन अशी एकूण बारा बेडची व्यवस्था अंत्यविधीसाठी करण्यात आली आहे. सिडको भागात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या बेडची संख्या अपुरी पडत आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नातेवाइकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मोरवाडी स्मशानभूमीत दररोज तीसपेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असून त्यात वीसहून अधिक कोरोना रुग्णांचे मृतदेह आहेत. या ठिकाणी असलेल्या चार बेडवर कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार केले जातात. अन्य मृतदेहांवर बेडशेजारी सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. अशीच परिस्थिती उंटवाडी अंबड, कामटवाडे या ठिकाणीही होत असून स्मशानभूमीतील बेड अपुरे पडताना दिसून येत आहे.
कोट====
कोरोना महामारीमुळे अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी दररोज तीसहून अधिक मृतदेह येत आहेत. यामुळे अंत्यविधी करण्यासाठी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ रुग्णांच्या नातेवाइकांना वाट पाहावी लागत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यापुढील काळात अजूनही बिकट अवस्था निर्माण होईल.
- सद्दाम मणियार, अमरधाम ठेकेदार
-----
(फोटो १६ अमरधाम)