हिरावाडी जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:40 AM2019-06-08T00:40:35+5:302019-06-08T00:41:26+5:30
महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
पंचवटी : महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. सकाळी या ट्रॅकवर शेकडो नागरिक पायी चालण्यासाठी येतात त्याचवेळी हे श्वान ट्रॅकवर ठाण मांडून बसलेले असल्याने ते पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने फिरणे मुश्किल झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने महापालिका प्रशासनाने श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेकडो ट्रेकर्सने केली आहे. जॉगिंग ट्रॅकवर मोकाट फिरणारे श्वान माती उकरून खड्डे तयार करत असल्याने सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक विशेषत: वृद्ध ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरुन पडून जखमी होण्याची दाट शक्यता आहे. जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीही केली होती.
मनपा हद्दीतील मोकाट श्वान पकडण्याची कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळी पायी फिरण्यासाठी येणाºया ट्रेकर्सना हातात दगड, विटा घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे मोकाट श्वानांनी नागरिकांना चावा घेतल्यानंतर मनपा प्रशासन दखल घेणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.