नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून खून; कालव्यात फेकला मृतदेह
By अझहर शेख | Published: September 11, 2022 07:13 PM2022-09-11T19:13:23+5:302022-09-11T19:13:32+5:30
अपहरणकर्त्यांनी खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिला.
नाशिकरोड: येथील एकलहरारोड वरील लाकडी फर्निचर बनविणाऱ्या स्वस्तिक कारखान्याचे संचालक व्यावसायिक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांच्या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी या घटनेने नाशिक शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनवणे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान नाशिकरोड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल शेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) यांचे एकलहरा रोडवर स्वस्तीक फर्निचर नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात शालेय लाकडी बाक तयार केले जातात. अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (दि.९) दुपारी साडे चार ावाजेच्या सुमारास सोनवणे कारखान्यात आले होते. यानंतर एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्ती कारखान्यासमोर आले. त्यांनी कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला सोनवणे यांना आँर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडी जवळ पाठविण्यास सांगितले. मात्र, फिरोज याने त्यांना ‘आपणच कारखान्यात चला..,’ असे सांगितले असता गाडीतील व्यक्ती दिव्यांग असल्याचा संशयितांनी बनाव केला. त्यामुळे फिरोज याने मालक सोनवणे यांना कारखान्यात जाऊन तसा निरोप दिला. यानंतर सोनवणे हे बाहेर आले व गाडीत बसले. सोनवणे हे कुठेच मिळून येत नसल्याने अखेरीस सायंकाळी उशिरा नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.या घटनेने संपुर्ण सोनवणे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुटुंबियांसह कारखान्यातील कामगारांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे.
सीसीटीव्हींची पाहणी; कामगारांकडे चौकशी
बेपत्ता नोंदीचा तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकांकडून केला जात होता. घोटी, शिंदे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज व फोन काॅल्सच्या आधारे तपासाला गती दिली जात होती; मात्र शनिवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलिसांना सापडला. मृतदेहावर विविध जखमाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वस्तिक कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे हे अगोदरपासूनच बंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कारखान्यामध्ये बारा कामगार कामाला असून त्यांची प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली आहे. मात्र कुठलाही सुगावा हाती लागू शकलेला नाही. सोनवणे यांचा मुलगा व सून हे अमेरिकेत वास्तव्यास असून ते सोमवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये पोहचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.