जुन्या नाशकात मध्यरात्री उडाला आगीचा भडका; चार कुटुंबांचा संसार बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:14 PM2018-02-07T14:14:02+5:302018-02-07T14:17:46+5:30
अग्निशामक दलाला स्थानिक तरुणांचे सहकार्य लाभल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. तरुणांनी बघ्याची भूमिका न घेता सामाजिक संवेदनांची जाग्या ठेवून मदतकार्यात भाग घेतल्याचे दिसून आले.
नाशिक : जुन्या नाशकातील चौकमंडई भागात असलेल्या कौलारू घरांना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत तीघे रहिवासी जखमी झाले तर संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तासभर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यास यश आले.
रात्रीच्या सुमारास जुने नाशिक परिसरात चौकमंडई भागातून धूराचे लोट आकाशात उठले. काही वेळेतच आगीच्या ज्वालाही दिसू लागल्या आणि परिसरातील विद्युतपुरवठाही तातडीने खंडीत करण्यात आला. परिसरातील लोकांनी तातडीने जळत्या घरांच्या दिशेने धाव घेतली. या घरांच्या शेजारी असलेल्या उंच इमारतीवर रहिवाशांनी धाव घेत गच्चीवरील पाण्याच्या टाकीतून रहिवाशांनी बादलीने पाणी जळत्या घरांवर फेकण्यास सुरूवात केली. घटनची माहिती समजताच मुख्यालयातील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. लाकडी कौलारु घरे असल्यामुळे आगीने त्वरित रौद्रावतार धारण केला होता. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करुन आग विझविण्यास सुरू वात केली. सब स्टेशन आॅफिसर दिपक गायकवाड यांनी आगीची तीव्रता लक्षात घेत मदतीसाठी सिडको, पंचवटी, कोणार्कनगर विभागीय केंद्रावरुन बंबांना पाचारण केले. पाच बंबाच्या सहाय्याने अर्धा तास जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविली. आगीचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. अरुंद गल्ली-बोळामुळे बंब घटनास्थळी पोहचण्यास काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. तसेच बघ्यांची गर्दी वाढल्याने भद्रकाली पोलीसांनी घटनास्थळी पोहचून गर्दीवर नियंत्रण ठेवत अग्निशामक दलाचे कार्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला. लिडिंग फायरमन श्याम राऊत, तानाजी भास्कर, राजेंद्र पवार, उदय शिर्के, मंगेश पिंपळे, देविदास इंगळे, संजय राऊत, विजय शिंदे आदिंनी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
चार कुटुंबांचा संसार बेचिराख
या आगीमध्ये सादिक कामरान अत्तार, शहनाज तय्यब, अब्दुल रज्जाक मनियार, किशोर माणिकसिंग परदेशी या कुटुंबियांचा संसार बेचिराख झाला. दरम्यान, आग विझविण्याच्या प्रयत्नात रफिक मनियार या इसमास आगीच्या ज्वालांची झळ बसली. त्यांना तत्काळ पोलीस वाहनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले. या घटनेत अन्य दोघे युवक किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहे. अग्निशामक दलाला स्थानिक तरुणांचे सहकार्य लाभल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. तरुणांनी बघ्याची भूमिका न घेता सामाजिक संवेदनांची जाग्या ठेवून मदतकार्यात भाग घेतल्याचे दिसून आले.
---