फिजिकल डिस्टसिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:27+5:302021-05-09T04:15:27+5:30
ग्राहकांना आर्थिक भुर्दंड नाशिक : भाजीपाला विक्रेत्यांवरही निर्बंध लावण्यात आल्याने भाजीपाला दरावर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ...
ग्राहकांना आर्थिक भुर्दंड
नाशिक : भाजीपाला विक्रेत्यांवरही निर्बंध लावण्यात आल्याने भाजीपाला दरावर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी सर्वसामान्य ग्राहकांना मात्र त्याचा काहीही लाभ मिळत नाही. किरकोळ विक्रेते चढ्या दरानेच भाजीपाला विकत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो.
औेषधे मिळू लागल्याने दिलासा
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मध्यंतरी काही औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता सर्वच प्रकारची औषध बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कामांची गती मंदावली
नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के उपस्थिती राहत असल्यामुळे कामांचा निपटारा होण्याची गती मंदावली आहे. अनेक कामे खोळंबून राहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून, आजचे काम उद्यावर ढकलावे लागत आहे.
मोफत डब्यामुळे अनेकांची सोय
नाशिक : शहरातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने कोरोना रुग्णांना मोफत डबे पुरविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेकांची सोय झाली आहे. काही ठिकाणी पूर्ण कुटुंबच बाधित असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खाद्यपदार्थ मागविणे झाले कमी
नाशिक : कोरोनाच्या भीतीमुळे बाहेरचे पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यावसायावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या हॉटेल्स बंद असले तरी जेथे पार्सल सेवा सुरू आहे त्यांनाही पुरेशा ऑर्डर मिळत नसल्याची स्थिती आहे.
पेट्रोल , डिझेलचे दरवाढल्याने नाराजी
नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्याने सर्वसामान्य वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून स्थिर असलेल्या किमती गेल्या दोन -तीन दिवसांपासून पुन्हा वाढू लागल्या आहेत.
काम मिळणे झाले मुश्कील
नाशिक : कोरोना रुग्ण वाढल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे बांधकाम मजुरांना काम मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक कामे बंद आहेत, तर काहींनी कामे पुढे ढकलली आहेत. सकाळी नाक्यावर जमणाऱ्या मजुरांना दहानंतर पुन्हा माघारी फिरावे लागत आहे.
शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद
नाशिक : शहरातील अनेक भागातील पथदीप बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरतो. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. अनेक रस्त्यांवर दिवे नसल्याने छोटे-मोठे अपघात घडतात. यातून अनेकवेळा बाचाबाचीचे प्रकार घडतात. मनपाने पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिरची व मसाला साहित्य घरपोहोच
नाशिक : वर्षभरासाठी लाल तिखट, हळद व मसाला करून ठेवण्यासाठी सध्या महिला वर्गात धावपळ सुरू आहे. कोरोनामुळे बाजारपेठ सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू राहत असल्याने अडचण होत आहे. काही दुकानदारांनी लाल मिरची व मसाला बनवण्याचे साहित्य घरपोच देण्याची सेवा सुरू केल्याने महिला वर्गातून या सेवेला पसंती मिळत आहे.