११ हजार उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:43+5:302021-01-16T04:18:43+5:30
नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील ...
नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील १९५२ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत सरासरी ७० टक्के इतके मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला मात्र तत्काळ यंत्रे बदलून देण्यात आली. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवार दि. १८ रोजी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील १० लाख ९६ हजार १६२ मतदारांपैकी सुमारे ७ लाख ५३ हजार २८१ मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६८.८७ टक्के इतके मतदान झाले. सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. महिला मतदार आणि वयोवृद्धांचा मतदानासाठीचा उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत सर्वत्र शांततेत मतदान सुरू असतांना जिल्ह्यातील अनेक भागात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बदलून देण्याची वेळ आली.
--इन्फो--
त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरीत ८० टक्के पेक्षा अधिक मतदान
त्र्यंबकेश्वर येथील तीन, दिंडोरीतील ५३ तर इगतपुरीतील ७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात मतदारांचा उत्साह अधिक दिसून आला. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र इगतपुरी, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत ८० टक्केच्या पुढे मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेनुसार येथील आकडेवारी इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असू शकते.
--इन्फो--
३३ केंद्रांवर ईव्हीएम बदलले
जिल्ह्यातील एकूण १९५२ मतदान केंद्रांपैकी ३३ मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाला. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. येथील मतदान यंत्रे बदलण्याची वेळ आली. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीसाठी २५६० कंट्रोल युनिट तसेत २५६० ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ५०० अतिरिक्त यंत्रे ठेवण्यात आली होती.
--कोट--
निवडणूक शांततेत
संपूर्ण जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडली. दिवसभरात काही ठिकाणी ईव्हीएम बाबत तांत्रिक अडचण आल्याने वेळेत मशीन्स बदलून देण्यात आली. त्यामुळे कुठेही मतदानात खंड पडला नाही. प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.