चांदवड तालुक्यातील ६५ उमेदवारांचे भवितव्य आज होणार इव्हीएममध्ये बंद
By admin | Published: February 20, 2017 11:35 PM2017-02-20T23:35:31+5:302017-02-20T23:35:48+5:30
चांदवड तालुक्यातील ६५ उमेदवारांचे भवितव्य आज होणार इव्हीएममध्ये बंद
चांदवड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी चांदवड तालुक्यात चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी एकूण ६५ उमेदवारांचे भवितव्य आज इव्हीएममध्ये बंद होणार आहे. त्यात चार गटांसाठी २०, तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी ४५ उमेदवार उभे ठाकले आहेत. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना नायब तहसीलदार रुपेश सुराणा, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत गुरव, बी.पी. खंगरे, दिलीप मोरे, भरत शेवाळे, भोसले यांसह निवडणूक कर्मचारी सहाय्य करीत आहेत. प्रशासनाच्या वतीने गट व गणनिहाय मतदानयंंत्रांमध्ये उमेदवारांची नावे व चिन्ह टाकून यंंत्रे सील करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाची, तर पंचायत समिती गणांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका राहणार आहे. सोमवारी सुमारे १००८ कर्मचारी आपापल्या नियुक्त केंद्रांकडे रवाना झाले. मंगळवार, दि. २१ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रशासकीय इमारतीत मतमोजणीस सुरुवात होईल. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच पोलीस यंत्रणाही सज्ज झाल्याचे चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी सांगीतले. बंदोबस्तासाठी पोलीस उपअधीक्षक १,पोलीस निरीक्षक १, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक ११, पोलीस कर्मचारी १५३, होमगार्ड ८०, महिला होमगार्ड १७ आदि पोलीस कर्मचारी, गृहरक्षक यांचा समावेश आहे. (वार्ताहर)