आरोग्यसेवेचे भविष्यमान - आज अन् उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:46 PM2021-04-17T18:46:00+5:302021-04-17T18:46:24+5:30
नाशिक : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे परत आता प्रशासनाची वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीची प्रचंड धावपळ सुरू झालीय अन् वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्था प्रचंड तणावाखाली आलीय परत एकदा आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड्या पडताय आणि परत एकदा आपण त्याच ठिकाणी वर्तुळ पूर्ण करून येतोय असे दिसतेय !
नाशिक : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे परत आता प्रशासनाची वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीची प्रचंड धावपळ सुरू झालीय अन् वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्था प्रचंड तणावाखाली आलीय परत एकदा आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड्या पडताय आणि परत एकदा आपण त्याच ठिकाणी वर्तुळ पूर्ण करून येतोय असे दिसतेय !
मग यावर उपाय काय?
भविष्यातील कोरोनासारखी आव्हाने ओळखून सक्षम आरोग्यसेवा उभारावी लागेल व सध्याच्या आरोग्यव्यवस्थेची पुनर्बांधणी करावी लागेल असे दिसतेय विशेषत नाशिक आता स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणार आहे तेव्हा येथील आरोग्यव्यवस्थाही तेवढीच स्मार्ट होणे सर्वांचे हिताचे होणार आहे त्यादृष्टीने हा उहापोह
१) सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज आजमितीस सर्वसामान्य जनांचा आधार म्हणजे आपली जिल्हा सामान्य रुग्णालये व महापालिकेची रुग्णालये बळकट करणे आवश्यक आहे. तेथील केवळ बेडची संख्या नव्हे तर आवश्यक मनुष्यबळ (ज्यात डॉक्टर, परिचर, वॉर्डबॉय) यांची भरती करणे आवश्य आहे. ऐनवेळी तहान लागल्यावर जाहिरातींना प्रतिसाद मिळत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कायम स्तरावर मनुष्यबळाची भरती करणे आवश्यक आहे.
२) नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणसंस्था सुरू करणे.
याबाबतीत अनेकदा शासन घोषणा झाल्यात, पण प्रत्यक्ष कार्यवाही होऊन नवीन पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन सेवेसाठी नवीन मनुष्यबळ (डॉक्टर्स) उपलब्ध करून देणेची महत्त्वाची जबाबदारी या शैक्षणिक संस्था पार पाडतील त्यासाठी उपलब्ध जिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालयांची उपलब्ध बेडस् शैक्षणिक कार्यासाठी वापरता येतील.
या संस्थांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असणारी नाशिक नगरी वैद्यकीय शिक्षण नकाशावर येण्यास मदत होईल. सार्वजनिक आरोग्य शिक्षणांचे राष्ट्रीयीकरण केल्यास सोन्याहून पिवळे.
३) शासकीय जनआरोग्य योजना (महात्मा फुले व प्रधानमंत्री) प्रभावीपणे राबविल्यास सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल त्यासाठीची आर्थिक तरतूद वाढविणे व रुग्णालयांची बिले वेळेत देणे खूपच गरजेचे आहे
४) आयएमएस (इंडियन मेडिकल सर्व्हिसेसची) निर्मिती करणे
आयएमए सातत्याने केंद्र सरकारकडे ही मागणी करतेय कारण सध्या (जिल्हाधिकारी/उपजिल्हाधिकारी) मंडळींना आरोग्यज्ञान तोकडे असल्याने बऱ्याचवेळा आरोग्यदृष्टीने सर्वच निर्णय अचूकपणे घेतले जात नाही त्यात काहीवेळा फक्त राजकीय सोय व सवंत लोकप्रियतेला धरून आरोग्यदृष्टीने चुकीची अंमलबजावणी होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील असल्यास प्रभावी यंत्रणा निर्माण होईल व योग्य वचकही राहील.
५) ग्रामीण आरोग्यांवरील आर्थिक तरतूद वाढविणे आवश्यक आहे. जेणेकरून साथीच्या आजारांवर ग्रामीण व कुटीर रुग्णालयातच उपचार होऊन त्यांना शहराकडे धाव घेण्याची गरज पडणार नाही.
६) संदर्भ सेवा रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण व सेवा सुरू होण्याबाबत
शालिमारच्या संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी व हृदयरोग प्रत्यारोपण विभाग सुरु होण्याबाबत प्रयत्न चालू आहे ते लवकरच प्रत्यक्षात येतील तसेच या रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षण व विशेष १०० खाटांचे स्त्री रुग्णालय जे खासकरून महिलांच्या आरोग्य समस्यांची दखल घेईल सुरू होण्यासाठीही प्रतीक्षा आहे.
७) खासगी रुग्णालयेही काळानुरूप कात टाकताय. सर्व कॉर्पोरेट रुग्णालयात आता आधुनिक सोयी व शस्त्रक्रिया मुंबई, पुण्याप्रमाणेच उपलब्ध आहेतच रोबोटिक शस्त्रक्रियाही सुरू होताय, त्यामुळे काही दिवसांतच नाशिक देशाच्या आरोग्य पर्यटन नकाशावर ठळकपणे दिसेल यात शंका नाही, मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्ती आरोग्यासाठीची अधिकची तरतूद व सकारात्मक प्रशासकीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
अशा योग्य धोरणांनी भविष्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करून भविष्यात येणार्या महामारीना आपण कोरोनापेक्षाही अधिक चांगले उत्तर देऊ शकू अशी आशा वाटते.
- डॉ. मंगेश थेटे
माजी अध्यक्ष, आयएमए, नाशिक.