पोलीस अकादमीतील भावी ‘पीएसआय’ ‘सैराट’; ‘ग्रुप डान्स सेलिब्रेशन’ची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:15 AM2021-03-28T02:15:36+5:302021-03-28T06:08:44+5:30
महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
नाशिक : कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी भावी पोलीस उपनिरीक्षकांनी (पीएसएआय) ‘सैराट’ गाण्यावर एकत्र येत येथील सभागृहात ग्रुप डान्स करत नियम सर्रासपणे पायदळी तुडविले. भावी पोलीस अधिकाऱ्यांचा समूहनृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून शनिवारी चांगलाच व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसचेही लसीकरण पूर्ण केल्याचा दावा अकादमीच्या सूत्रांनी केला. नाचताना कोणीही मास्क लावलेला नव्हता.
डान्सचा व्हिडिओ व्हायरल : भावी पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अतिउत्साही होत बेभानपणे एकत्र येत पोलीस अकदामीच्या सभागृहात ब्लेझर सूट परिधान करत जोरदार ‘डान्स’ केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामधून शनिवारी सकाळी व्हायरल झाला. दिवसभर सोशल मीडियामध्ये या व्हिडिओची चर्चा रंगल्यानंतर संध्याकाळी अकादमीकडून खुलासा करण्यात आला.
विभागीय स्तरावर चौकशी करणार
बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून सांस्कृतिक कार्यक्रमाची परवानगी देण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमात कोविड लसीच्या दुसरा डोस घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली होती. बक्षीस वितरण समारोपानंतर वरिष्ठ अधिकारी परतल्यानंतर भावी पोलिसांनी एकत्र येत गर्दी केली आणि नृत्य केले. हे वर्तन अशोभनीय व चुकीचे असून याची विभागीय स्तरावर चौकशी केली जाईल, असे अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी सांगितले.