भाजी विक्रेत्यांकडून सुरक्षित अंतराचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:45+5:302021-05-25T04:14:45+5:30
इंदिरानगर : कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून किराणा मालाचा व्यवसाय सुरळीत सुरू झाला तसेच ग्राहकांनीही नियमांचे पालन करून ...
इंदिरानगर : कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून किराणा मालाचा व्यवसाय सुरळीत सुरू झाला तसेच ग्राहकांनीही नियमांचे पालन करून खरेदी केली.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने बारा दिवसांनंतर किराणा मालाची दुकाने सोमवारपासून सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. ग्राहकांनीही आखून दिलेल्या चौकोनात शारीरिक अंतर ठेवून खरेदी केली. महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे परिसरातील भाजी विक्रेत्यांसाठी साईनाथ नगर चौफुला येथे दहा विक्रेत्यांसाठी आणि कलानगर सिग्नललगत १२ भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी रस्त्याकडेला जागा निश्चित करून आखणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी निश्चित जागेच्या बाहेरसुद्धा भाजी विक्रेते व्यवसाय करत आहेत तसेच रथचक्र चौक, पांडव नगरीकडे जाणारा रस्ता, कलानगर सिग्नललगतचा शंभर फुटी रस्ता, सार्थक नगर बसथांब्यासमोर, जॉगिंग ट्रॅकलगत गजानन महाराज मार्ग, पिंगळे चौकसह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर परवानगी नसतानाही भाजी विक्रेते रस्त्याकडेला बसत आहेत. यावेळी त्यांच्याकडून शारीरिक सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याने त्यांना समज देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सकाळी अकरा वाजता परिसरातील सर्व किराणा दुकाने बंद करण्यात आली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची परिसरात गस्त सुरू होती.