गडकरी चौक अपघातातील स्कोडाचालकास अटक
By admin | Published: May 28, 2017 09:36 PM2017-05-28T21:36:08+5:302017-05-28T21:36:08+5:30
गडकरी चौकात तीन महिलांच्या मृत्युस कारणभभूत ठरलेला फरार स्कोडा कारचा चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गडकरी चौकात तीन महिलांच्या मृत्युस कारणभभूत ठरलेला फरार स्कोडा कारचा चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे़. शुक्रवारी(दि. २६) पहाटे गडकरी चौकात भरधाव स्कोडा कारने स्विफ्ट डीझायर कारला दिलेल्या धडकेत जळगाव येथील सरिता भामरे, योगिनी भामरे आणि मुंबईच्या आंबिवली येथील रेखा पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ या घटनेनंतर स्कोडा चालक शेख फरार झाला होता़
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे मुलीची कुंडली पाहण्यासाठी भामरे कुटुंबिय स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५ डीसी ०५२७) जात असताना गडकरी चौकात भरधाव स्कोडा कार (एमएच ०१ एएल ७९३१) ने स्विफ्टला धडक दिली़ यामध्ये तीन महिलांचा मृत्यू तर लीलाधर भामरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मुंबई नाका पोलिसांनी त्र्यंबकरोडवरील पेट्रोलपंपावरून इंधन भरून गडकरी चौकात येत असलेल्या स्कोडाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून चालक फय्याज फारुख शेख यांची ओळख पटवली़
मुंबई नाका पोलिसांनी फय्याज शेख यास शनिवारी (दि़२७) अटक केल्यानंतर त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान विना परवाना वाहन चालविणे व अपघातानंतर पलायन केल्याने त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवध व "हिट अँड रन"चा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली़