सुरगाण्यात पुन्हा धान्य घोटाळा

By admin | Published: October 5, 2016 12:35 AM2016-10-05T00:35:58+5:302016-10-05T00:36:26+5:30

दोन ट्रक जप्त : पोलिसांत गुन्हा दाखल

Gain scam again in Surgana | सुरगाण्यात पुन्हा धान्य घोटाळा

सुरगाण्यात पुन्हा धान्य घोटाळा

Next

नाशिक : दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी राज्यात गाजलेल्या रेशनच्या कोट्यवधी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे सुरगाणा येथील प्रकरण शमता शमत नसल्याचे आढळून आले असून, रविवारी (दि. २) सायंकाळी पुन्हा रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून दोन ट्रक खुद्द तहसीलदारांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर असा घोटाळा पुन्हा होऊच नये यासाठी राज्य सरकार व पुरवठा खाते विविध उपाययोजना करीत असताना त्याचबरोबर शासकीय धान्य गुदामातून रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या रेशनच्या धान्याच्या कण आणि कणाचा हिशेब जीपीएस यंत्रणेद्वारे घेण्याची वल्गना करणाऱ्या जिल्हा पुरवठा कार्यालयाचे यानिमित्ताने पितळही उघडे पडले आहे. रविवारी दुपारी सुरगाणा शहरातील आसावरी पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या दोन मालट्रक विषयी तहसीलदार अरुण शेलार यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकचालकाकडे ट्रकमध्ये काय आहे, याविषयी विचारणा केली. त्यावेळी ट्रकमध्ये भाताची साळ असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष या दोन्ही ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या जवळपास नव्वद टक्केभागामध्ये रेशनचे गहू व दहा टक्के भागामध्ये साळीचे पोते ठेवलेले आढळून आले. हा प्रकार म्हणजे शासकीय यंत्रणेला चकमा देण्याचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी पुरवठा निरीक्षक अहेर यांनी सुरगाणा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ट्रकचालक व मालक प्रशांत मोहन पिंगळे याच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला. ज्या पेट्रोल पंपावर सदरचे ट्रक उभे होते, तो पंपही पिंगळे यांच्याच मालकीचा असून, त्याला लागूनच पिंगळे यांचे धान्याचे गुदामही आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतून त्यांनी सदरचे गव्हाचे पोते विकत घेतल्याच्या पावत्या सादर केल्या असल्या तरी सदरच्या पावत्यांवर खाडाखोड करण्यात आली असल्याने त्या बनावट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर गाजलेल्या सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतरही जिल्हा पुरवठा कार्यालय या साऱ्या गोष्टींना आळा घालू शकत नाही या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Gain scam again in Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.