‘गट्टूर’कडून विवाहितेचा विनयभंग
By admin | Published: April 24, 2017 02:15 AM2017-04-24T02:15:37+5:302017-04-24T02:15:46+5:30
नाशिक : गुन्हेगारी स्वरुपाची मालिका असलेल्या गट्टूरचे धाडस पुन्हा वाढले असून, त्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल गेली आहे.
नाशिक : महिलांची छेडछाड, मद्यप्राशन करून धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ, हप्ते वसुली अशी गुन्हेगारी स्वरुपाची मालिका असलेल्या गट्टूरचे धाडस पुन्हा वाढले असून, त्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल गेली आहे.
वर्षभरापासून झोपडपट्टी दादा म्हणून वावरणाऱ्या सिद्धार्थनगर परिसरातील गट्टूर पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, त्याने एका विवाहितेची छेड काढल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलीस आता सुनील गायकवाड ऊर्फ गट्टूरवर (गटऱ्या) कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गट्टूर याने परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांवर दडपण आणले आहे, त्यामुळे त्याच्याविरोधात कोणीही आवाज बुलंद करायला तयार नाही. तरीदेखील एका विवाहितेने धाडस करून गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देत अन्यायाविरोधात न्याय मागितला आहे.
गट्टूर याने सिद्धार्थनगरमधील एका विवाहितेला भर रस्त्यामध्ये अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी या विवाहितेने पोलिसांकडे दाद मागितली असून, पोलिसांनी गट्टूरविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र पोलिसांनी केवळ कागदी घोडे न नाचविता थेट धडक कारवाई करून मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)