सहा लाखांची चोरी करणारा तीन महिन्यानंतर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:05+5:302021-07-07T04:18:05+5:30
शहरातील पाठक मैदानाजवळ नाना नानी पार्क शेजारील डिल्हिलेरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये ३० मार्च २०२१ रोजी अज्ञात चोरट्याने ...
शहरातील पाठक मैदानाजवळ नाना नानी पार्क शेजारील डिल्हिलेरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये ३० मार्च २०२१ रोजी अज्ञात चोरट्याने ऑफिसच्या पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये प्रवेश केला होता. ऑफिसमध्ये असलेला कपाटाचा दरवाजा व लॉकर उघडून त्यातील रोख रक्कम ६ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. यावेळी कंपनीच्या वतीने सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या धाडसी चोरीचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. शिंदे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत सदर संशयित गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळवली.
पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस नाईक नवनाथ पवार, प्रमोद साळवे, शशिकांत दौंदे, संतोष भगरे यांच्या पथकाने सुरत येथे जाऊन संशयित भूषण चंद्रकांत खैरनार (रा. वटार ता.बागलाण) यास अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या ९० दिवसात मुद्देमालासह संशयिताला जेरबंद करण्यात सटाणा पोलिसांना यश आले असून सर्वस्तरातून पोलिसांचे अभिनंदन होत आहे. या गुन्ह्याची उकल झाल्याने अजूनही काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी वर्तविली आहे.
060721\06nsk_18_06072021_13.jpg
संशयित भूषण खैरनार