नाशिकच्या सभ्य संस्कृतीला गालबोट सहन करणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:22+5:302021-07-01T04:12:22+5:30
नाशिकची घोडदौड ही अत्यंत वेगाने होत आहे. येथील शहरी-ग्रामीण जनता मुळात प्रगल्भ आणि कायद्याचे पालन करणारी आहे. तसेच येथील ...
नाशिकची घोडदौड ही अत्यंत वेगाने होत आहे. येथील शहरी-ग्रामीण जनता मुळात प्रगल्भ आणि कायद्याचे पालन करणारी आहे. तसेच येथील गावपातळीवर राहणारे लोकसुद्धा पाहुण्यांना आदराची वागणूक देतात अन् त्यांचे मनापासून आदरातिथ्य करतात; मात्र पाहुण्यांनी नाशिकच्या गावकुसातील संस्कृतीशी एकरूप होत येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पर्यटन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कुठल्याहीप्रकारे नाशिकच्या नावलौकिकाला तडा जाईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल असे कृत्य पाहुण्यांनी या पुण्यनगरीत करू नये, असेही पाटील यांनी ‘लोकमत’च्या संवाद उपक्रमात ठणकावून सांगितले. यावेळी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.
कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात नाशिकच्या ग्रामीण जनतेने पोलिसांना मोठे सहकार्य केले. कडक निर्बंध व लॉकडाऊनच्या काळात येथील ग्रामीण जनतेने गरजूंना मदतीचा हात पुढे करत आपल्यातील संवेदनशीलता अन् माणुसकीचा प्रत्ययही दिला, असेही पाटील यांनी संवादात अधोरेखित केले.
नाशिकच्या मालेगावामध्ये असलेला कुशल कारागीर वर्ग हा अन्य कुठल्याही शहरात अपवादानेच दिसून येईल. येथील कारागीर अशिक्षित जरी असले तरीदेखील त्यांच्यामधील कष्टाची तयारी अन् कुशलता वाखाण्याजोगी अशीच आहे; मात्र दुर्दैवाने मालेगावाला अद्यापही औद्योगिक झोन म्हणून बघितले जात नाही अन् औद्योगिकदृष्टया आवश्यक असलेला ‘बॅकअप’ पुरविला जात नसल्याची खंतही पाटील यांनी बोलून दाखविली.
--इन्फो--
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नाशिकच्या पर्यटनाचा मैलाचा दगड!
नाशिकचे पर्यटन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. येथील दुर्ग पर्यटन, धरण पर्यटन, निसर्गपर्यटनाला दिवसेंदिवस चालना मिळत आहे. इगतपुरी तालुक्यात लवकरच ‘आयुर्वेदिक वेलनेस हब’ तसेच भावली धरण भागातील विविध विकास प्रकल्प आकारास येणार आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हे तालुके नाशिकच्या पर्यटनाच्या घोडदौडीमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे, असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
--इन्फो--
‘खाकी’चा पाहुणचार देणारच!
कायद्यापुढे सर्वच समान आहे. कायद्याचा भंग करताना आढळून आलेल्या सेलिब्रिटीवर्गाला ‘खाकी’चा मनसोक्त पाहुणचार दिला जाणार आहे. जेणेकरून यापुढे निसर्गाचे वरदान लाभलेल्या इगतपुरीसारख्या तालुक्यात आणि त्र्यंबकेश्वर भागातसुध्दा कोणीही पाहुणे अंमली पदार्थांची अशाप्रकारे नशा करण्याचे धाडस करणार नाही तसेच धनदांडगे मंडळीसुद्धा आपले बंगले, रिसॉर्ट भाडेतत्त्वावर देताना चारदा विचार करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच पाहुण्यांचा उपलब्ध करून देतील, असेही सचिन पाटील यावेळी म्हणाले. इगतपुरीच्या रेव्ह पार्टीवरील कारवाईतून अनेकांना धडा मिळाल्याचेही ते म्हणाले.
===Photopath===
300621\30nsk_21_30062021_13.jpg
===Caption===
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक