जुगाऱ्यांना कोरोनाची भीती नाही; गर्दीत सर्रास रंगताहेत डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 08:47 PM2020-03-19T20:47:43+5:302020-03-19T20:49:48+5:30
शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून, साथरोग कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात चोरीछुप्या पद्धतीने चालविल्या जाणा-या जुगार अड्ड्यांवर गर्दी दिसून येत आहे. जुगारी मोठ्या संख्येने एकत्र येत पत्त्यांचा डाव रंगवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून धार्मिक सण, उत्सव, यात्रादेखील स्थगित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, उद्याने, आठवडे बाजार, मॉल्सदेखील बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर ३१ मार्चपूर्वी होणारे विवाह समारंभ, सोहळेदेखील रद्द करण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. नागरिकांची गर्दी शक्य तितक्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या जुगा-यांना कोरोनाची कुठलीही भीती नसल्याचे चित्र असून, पोलीस यंत्रणेचेही जुगार अड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जुगार अड्ड्यांना कोरोना कालावधीत सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. गर्दीच्या सर्व ठिकाणांवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून असताना जुगार अड्ड्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असून थेट धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुगार अड्डे चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी चोरट्या मार्गाने नजरेस येणार नाही, अशा ‘भूमिगत’ जागांची निवड करत तेथे जुगार खेळला व खेळविला जात आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे जुगाराचे डाव राजरोसपणे रंगत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनाही जुगा-यांचे ठावठिकाणे ज्ञात असूनही त्यांच्याकडून अज्ञात असल्याचे भासविले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.