कांदा दरात घसरगुंडीचा खेळ, बसेना खर्चाचा मेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:15 AM2021-12-18T01:15:05+5:302021-12-18T01:16:00+5:30
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील एक-दोन आठवड्यात लाल कांद्याची मोठी आवक होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील एक-दोन आठवड्यात लाल कांद्याची मोठी आवक होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांदा बाजारपेठेत गेले काही दिवस लाल कांद्याला चांगल्या दर्जामुळे बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने लासलगाव येथे किमान दररोज वीस हजार क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी येत आहे. पुढील सप्ताहात कांदा आवक वाढून तीस ते पस्तीस हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. चालू सप्ताहात गेल्या सोमवारी (दि. १३) २,५०० रुपये हा कांद्याचा सर्वसाधारण प्रतिक्विंटल दर आता सहा दिवसातच १,६०० रुपयांवर आला आहे.
मागील सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारात लाल कांद्याची ६६,५०३ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ७००, कमाल रुपये ३,५०० तर सर्वसाधारण २,४२७ रुपये, तर उन्हाळ कांद्याची १९,८९९ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ६०० रुपये, कमाल ३,२०० रुपये, तर सर्वसाधारण २,२६५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. शुक्रवारी (दि. १७) दुपारच्या सत्रात १,२३२ नग कांदा लिलाव होऊन लाल कांद्याला किमान ७०१, कमाल २,५९९ तर सरासरी १,६५१ रुपये भाव राहिले.
लासलगाव बाजारात सरासरी कांदा भावात नऊशे रुपयांची घसरण झाली आहे. येत्या सोमवारी लासलगाव कांदा बाजारपेठेत कांदा आवक वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कांदा भावाची पातळी कशी राहते, याकडे उत्पादकांचे लक्ष लागून आहे.