गेम- कार्टूनशी जमली गट्टी, अभ्यासाशी घेतली कट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:25+5:302021-05-03T04:09:25+5:30
अमोल अहिरे जळगाव निंबायती : आम्ही तुमच्या वयाचे होतो, त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो, आम्हाला घरी दिलेला ...
अमोल अहिरे
जळगाव निंबायती : आम्ही तुमच्या वयाचे होतो, त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो, आम्हाला घरी दिलेला गृहपाठ पूर्ण केला नाही तर शाळेत व घरी दोन्ही ठिकाणी कठोर शिक्षा होत असे. तरीदेखील आम्हाला शिक्षकांचा व पालकांचा खूप आदर होता. तुमच्यासारखे तासनतास कार्टून पाहात बसत नव्हतो. हे वाक्य आपल्या लहान मुलांना म्हटले नाही, असे आई - वडील शोधूनही सापडणार नाहीत. सध्या हे चित्र घरोघरी पाहावयास व ऐकावयास मिळत आहे.
आपल्या मुलांना पालक नेहमीच अभ्यासाचे महत्व पटवून देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. वर्षभरापासून शालेय अभ्यासक्रमात ऑनलाईन शिक्षणाची पद्धती आल्यामुळे मुलांना मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर शिकवले जाते. लेक्चर संपले की, मुले लगेचच गेम, कार्टूनकडे वळतात. त्याचा बालमनावर विपरित परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्षच उडाले आहे. टेलिव्हिजनवरील कार्टून, मोबाईल, गेम्स, व्हिडिओ अशा गोष्टींमुळे मुलांना अभ्यासात गोडी राहिली नाही. त्यामुळे मुलांनी अभ्यासाशी कट्टी व गेम व कार्टूनशी गट्टी केली आहे. अनेक पालक यामुळे त्रस्त झाले आहेत.
अवास्तव गेम, इंग्रजी सिनेमांमधील भडक सादरीकरण, कार्टूनमधील काल्पनिक राक्षस, भूत, शत्रूचे कौर्याचे प्रसंग, त्यातून नायकाच्या व इतर पात्रांच्या अवास्तव शौर्यकथा याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. आलेले संकट, त्यातून शिताफीने बाहेर पडून शत्रूवर हल्ला करणे. सततचे युद्ध, हाणामारी, लढाईचे प्रसंग, शौर्याचे प्रसंग आदी अवास्तव गोष्टींचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मुलांमध्ये चंचलवृत्ती, हिंसकपणा, चिडचिडेपणा, वेंधळेपणा, आळशीपणा, नकारात्मक विचार, वडीलधार्यांशी अर्वाच्च भाषेत बोलणे, असंस्कृत शब्दांचा वापर करणे, एकत्र राहात असूनही घरात एकमेकांशी संवाद न करणे, घरभर पसारा करणे, सात्विक आहार नाकारून फास्टफूडसाठी हट्ट धरणे, मनाविरुद्ध झाले की, प्रचंड चिडचिड करणे, लहान मुलांना तर जेवताना मोबाईल हातात द्यावा लागतो आदी गोष्टी जाणवू लागल्या आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
इन्फो...
कोरोनाच्या भीतीमुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मित्रांना भेटता आले नाही. क्रीडांगणावर मनसोक्तपणे खेळता आले नाही. मामाच्या गावाला अथवा इतरत्र कुठेही जाता आले नाही. गार्डनदेखील बंद आहेत. मित्रांना घरी बोलवता येत नाही किंवा त्यांच्या घरी जाता येत नाही, साधी सायकलदेखील चालविता येत नाही. बाबांसमवेत बाजारात जाता येत नाही. आई - बाबा सारखे याला हात लावू नको, त्याच्याजवळ जाऊ नको, गॅलरीत उभा राहू नको, फ्रिजमधील पदार्थ, फळे खाऊ नको, शाॅवरखाली गार पाण्याने आंघोळ करू नको. आंबट नको, गोड नको, तिखट नको, तेलकट नको हे खाऊ नको, ते खाऊ नको असे रागवत असतात. सारखे फोनवर बोलतात, बातम्या पाहतात. त्यामुळे आम्हाला मनोरंजनासाठी एकमेव पर्याय गेम व कार्टूनचा आहे. कधी एकदाचा कोरोना जाईल, याची वाट पाहात आहे.
- आराध्य अहिरे, विद्यार्थी
===Photopath===
020521\02nsk_8_02052021_13.jpg
===Caption===
कार्टून