भाजपाकडून ठरवून पाटील यांचा गेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:57 AM2019-06-29T00:57:13+5:302019-06-29T00:57:34+5:30
भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती
नाशिक : भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती. परंतु आता महासभेत या नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर न करताही त्यांना केबीन आणि अन्य सुविधाही देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या वातावरणात दिनकर पाटील हे कळीचे ठरत असले त्यांचे पदाधिकाऱ्यांशी वारंवार खटके उडत होते. गेल्या वर्षीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव आणि नंतर स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या विरोधातील बंड यावरून एकदा रामायण आणि एकदा वसंत स्मृती या दोन्ही ठिकाणी त्यांचे अन्य पदाधिकाºयांशी वाद सुरू झाल्याने त्यावेळेस पासूनच सभागृह नेते पदावरून हटविण्याची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेले आंदोलन हे केवळ निमित्त ठरले, असल्याचे दिसते. सभागृह नेतापदी सतीशबापू सोनवणे यांचे नाव प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्याच्या निमित्ताने पश्चिम मतदारसंघातून आले आहे, तर जगदीश पाटील हे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. संभाजी मोरुस्कर यांचे हे पददेखील सहज काढले नसून त्यांच्यावरही अनेक वादांना कारणीभूत ठरविण्यात आले आहे. अर्थात, त्यांना पदे दिल्यानंतर महापौरांनी आणि प्रशासनाने ज्या तडकाफडकी त्यांना केबीन आणि अन्य सुविधा करून दिल्या आहेत. त्यामुळेदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
महापौरांच्या भूमिकेमुळे आश्चर्य
सभागृहनेता किंवा गटनेता या पदासाठी पक्षाने नियुक्ती केल्याचे पत्र मिळाल्यानंतर महासभेत त्याचे वाचन होते आणि त्यानंतर महापौर त्या पदाची घोषणा करतात. कॉँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती होऊनही महापौर रंजना भानसी यांनी मात्र पक्ष गटनेत्याचे पत्र मागितले होते. मात्र सभागृहात घोषणा होण्याच्या आतच दोन्ही पदाधिकाºयांनी आयुक्तांकडे बैठकीत सहभाग घेतला आणि त्यांना दालने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तथापि, तांत्रिक बाजू तपासली तर सध्या दोन सभागृह नेते आणि भाजपाचे दोन गटनेते असा प्रकार झाला आहे.