‘शक्यतांचा खेळ’

By admin | Published: September 12, 2014 12:06 AM2014-09-12T00:06:39+5:302014-09-13T01:06:07+5:30

‘शक्यतांचा खेळ’

'Game of possibilities' | ‘शक्यतांचा खेळ’

‘शक्यतांचा खेळ’

Next

 
केवळ क्रिकेटच्या खेळालाच नव्हे, तर राजकारणाच्या खेळालाही हल्ली ‘शक्यतांचा खेळ’ (गेम आॅफ पॉसिबिलिटीज) म्हणतात. त्यातही पुन्हा जेव्हां वातावरण निवडणूकमय झालेले असते, तेव्हां नानाविध शक्यता तर निर्माण होतातच, पण त्या गृहीत धरुन तसे आडाखे वा डावपेच रचले जातात. जेव्हां कोणत्याही एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमताचा आधार प्राप्त असतो, तेव्हां निर्माण होणाऱ्या शक्यता अत्यंत जुजबी स्वरुपाच्या असल्याने पक्षाने जे काही अगोदरच ठरविले आहे, त्यावर शिक्कामोर्तब करणे, इतकेच काय ते काम बाकीच्यांना करायचे असते. पण जेव्हां परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते, विविध पक्षांचा गलबला असतो, जो तो इतरांवर कुरघोेडी करायला टपलेला असतो. तेव्हां शक्यतादेखील भूमितीय पद्धतीने वाढलेल्या असतात. अशा स्थितीत मग सुस्पष्ट बहुमताचा वर कोणालाही प्राप्त नाही, पण ते वसूल करण्याची ईर्ष्या मात्र कोणीही त्यागायला तयार नाही, अशा टप्प्यातील नाशिक महानगरपालिकेत आज होणारी शहराच्या नव्या महापौराची निवडणूक अपवाद कशी असू शकेल?
४लहान मुलांच्या गोष्टीतील जादूगाराचा प्राण जसा एखाद्या पोपटाच्या पोटातील अंगठीत असतो, त्याप्रमाणे राज ठाकरे यांचा राजकीय प्राण नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत गुंतलेला असल्याचे बहुतेक साऱ्यांनी गृहीत धरले असल्याने, राज ठाकरे यांना अपशकून करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष टपलेले आहेत. (यात काही मनसे सैनिकही आहेत?)
४राजबाबूंनी नाशकात आपले राजकीय पाय घट्ट रोवले, ते प्रामुख्याने छगन भुजबळ यांना सतत तोफेच्या तोंडी देऊन. भुजबळांची अत्यंत प्रच्छन्न अवहेलना जितकी या ठाकरेंनी केली तितकी ती मोठ्या वा त्यांचे वारस ठरलेल्या छोट्या ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे राज-भुजबळ एकीकरण होणार नाही वा होऊ नये असे काहींना वाटते, पण राजकारणात तसे होईलच असे नाही कारण येथे काहीही होणे शक्य असते.
४नाशकातील भुजबळांच्या व्यक्तिगत राजकारणाला महत्व प्रदान करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मनसेला दूर ढकलतील आणि भुजबळांची बूज राखतील किंवा त्यांनी ती राखावी, असे भले काहींना वाटो, पण तसे होईलच असेही नाही.
४भुजबळ नाशकात बसून महाराष्ट्र पाहू इच्छित असतील पण पवारांचे तसे नाही. त्यांना संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा विचार करावयाचा असल्याने आजच्या घडीला त्यांना राज ठाकरे यांच्याप्रती उमाळा येणारच नाही, असे नाही. किंबहुना तो येईल याचीच शक्यता अधिक. कारण राज्याच्या ग्रामीण भागात जिथे राष्ट्रवादी पोहोचली आहे, तिथे शिवसेना अगोगरपासूनच हजर आहे. साहजिकच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अधिकाधिक डोकी निवडून आणायची, तर सेना नामोहरम झाली पाहिजे आणि ते सत्कार्य राज ठाकरे यांच्याशिवाय कोण अधिक चांगले करु शकेल?
४जे शरदरावांचे तेच नितीन गडकरींचे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या गादीवर भाजपाचा उमेदवार बसवायचा, तर सेनेच्या तुलनेत भाजपाची दोन-चार का होईना जास्तीची डोकी निवडून यावीच लागतील. त्यासाठी सेनेला शक्य होईल तिथे आणि तितके खिंडीत गाठावे लागेल. हे काम करायलाही पुन्हा तरबेज कोण, तर राज ठाकरे!
४महापौर होण्याची मनिषा अनेकांनी व्यक्त केली असली तरी शिवसेना याबाबतीत बरीच पावले पुढे चालून गेल्याचे चित्र आहे. अल्पाहून अल्प संख्याबळाच्या जोरावर सेना हे पद खेचून आणण्याच्या प्रयत्नात असल्याने साहजिकच सेनेला तिच्या इप्सितापासून मागे खेचणे हादेखील मग अन्य साऱ्या पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. तो तडीस न्यायचा, तर असंगाशी संग करण्याची तयारी ठेवणे ओघानेच येते. त्यामुळे उभय काँग्रेस आणि मनसे यांच्या हातमिळवणीची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर अनायासे अति महत्वाकांक्षेने गांजलेल्या भाजपाचाही मुखभंग होऊ शकेल.

Web Title: 'Game of possibilities'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.