गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:23 AM2018-09-14T00:23:10+5:302018-09-14T00:25:53+5:30

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस केवळ बाप्पाचीच आराधना चालणार आहे.

 Ganapati Bappa Moraya | गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

googlenewsNext
ठळक मुद्देविघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत हजारांहून अधिक मंडळांकडून प्रतिष्ठापना

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस केवळ बाप्पाचीच आराधना चालणार आहे.
दरवर्षीच ज्या आराध्य दैवताची प्रतीक्षा केली जाते अशा गणरायाच्या स्वागतासाठी तशी अगोदरच सज्जता झाली होती. काही सार्वजनिक मंडळांनी एक दिवस अगोदरच श्रींची वाजत-गाजत मिरवणूक काढली असली तरी बहुतांशी मंडळे आणि घरगुती उत्सवासाठी गुरुवारी म्हणजेच गणेश चतुर्थीचाच मुहूर्त साधला. शहराच्या विविध भागांत गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी असलेल्या बाजारपेठांमध्ये आलेल्या विविध रूपातील गणेश रूपे बघून त्यातून प्रसन्न मूर्ती शोधण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. मूर्तीची अचूक निवड केल्यानंतर पूजा करून त्या मूर्तींना विधीवत घरी नेताना जागोजागी नागरिक सहकुटूंब सहपरिवार येत होतेच, परंतु मोठ्या मंडळाचा साज काही औरच होता. निवडलेल्या मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात नेतानाच छोट्या मिरवणुकाही काढण्यात आल्या.
काही मंडळांनी तर खास ढोल पथकेही आणून स्वागताच्या मिरवणुकीत साहसी खेळ तसेच लेजीम पथकाच्या कलाही सादर करण्यात आल्या. गणरायाच्या आगमनाबरोबरच विविध पूजा आणि प्राणप्रतिष्ठेसाठीदेखील सकाळपासूनच बाजारपेठेत धावपळ दिसली. रविवार कारंजा, भद्रकाली रोड आणि फूल बाजाराबरोबरच आकाशवाणी टॉवर, ठक्कर डोम, त्रिमूर्ती चौक अशा ठिकठिकाणी बाजार थाटले होते. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या पत्री, फुले, हार त्याचबरोबर पूजाविधीचे अन्य साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फुले आणि अन्य साहित्याचे दर गर्दी बघून ठरले. साधारणत: चाळीस रुपये पाव किलो या दराने फुले तर तीस रुपयांपासून पुढील दराने हारांची विक्री करण्यात आली. घरोघरी पार्थिव गणेशात प्राणप्रतिष्ठा करून विधीवत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नााशिक शहरात लहान-मोठी सुमारे सातशे मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. बहुतांशी मोठ्या मंडळांना यंदा उत्सव आणि मंडपाची परवानगी घेण्यात आलेल्या अडचणींमुळे वेळेत सजावट पूर्ण झालेली नसली तरी अनेक ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच सजावटीची कामे पूर्णत्वास आलेल्या मंडळांनी आपले देखावे खुले केले. अर्थात, ८० टक्के देखाव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
गणरायाच्या आगमनामुळे घराघरांत उत्साहाचे वातावरण असून, आता दहा दिवस श्री गणपती अथर्वशिर्ष पठणासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
घरोघरी शाडूमातीच्या मूर्ती
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक फिनिशिंगच्या असल्या तरी गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही शाडूमातीच्या मूर्तींनाच अधिक मागणी होती. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी शाडूमातीच्या गणेशमूर्तीचे फलकदेखील लागले होते. घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडूमातीच्या मूर्तीलाच प्राधान्य दिले.
रस्त्यांवरील स्टॉलच्या संख्येत घट
महापालिकेने रस्त्यावर मूर्ती विक्री करण्याऐवजी मैदानांच्या काही जागा निश्चित केल्या होत्या त्यात गोल्फ क्लब (ईदगाह) मैदानाचादेखील समावेश होता. परंतु विक्रेत्यांनी त्याऐवजी डोंगरे मैदान आणि ठक्कर डोम या खासगी जागेत मूर्ती विक्रीचे स्टॉल्स थाटले. महापालिकेचे स्टॉलच्या लिलावातून मिळणारे उत्पन्न बुडाले असले तरी रस्त्यावर विक्री थांबविण्याचा उद्देश मात्र बºयापैकी सफल झाला.

Web Title:  Ganapati Bappa Moraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.