सातपूरला गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:30 AM2019-09-14T00:30:25+5:302019-09-14T00:30:56+5:30
‘निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत, तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,’ अशी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे अशी विनवणी करीत ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
सातपूर : ‘निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत, तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,’ अशी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे अशी विनवणी करीत ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातपूर परिसरात २८ हजार ३६२ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून, जवळपास २० टन निर्माल्य जमा झाले आहे.
गेल्या ११ दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला भरपावसात भावपूर्ण निरोप देण्यात आला. महानगरपालिकेने सातपूर परिसरात नंदिनी नदी पूल, गंगापूर धबधबा, सोमेश्वर धबधबा, चांदशी पूल, मते नर्सरी पूल याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. याशिवाय पाइप लाइनरोड, अशोकनगर पोलीस चौकी, शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक आदी ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या कृत्रिम तलावातदेखील भाविकांनी श्रींचे विसर्जन केले. घराघरातील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला.
सातपूर गावातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले. नंदिनी पुलाजवळ जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कामगिरी बजावली.
सातपूर परिसरातील मूर्ती संकलन
नंदिनी नदी पूल सातपूर-अंबड लिंकरोड-४,९६३,
गंगापूर धबधबा-५,८२८,
सोमेश्वर परिसर-१,१५४,
चांदशी पूल, आनंदवली-१,३४८
मते नर्सरी पूल-२,८४६,
आयटीआय पूल-८,३०६,
पाइपलाइन रोड, कृत्रिम तलाव-९१६,
अशोकनगर पोलीस चौकी,कृत्रिम तलाव-१,५२१,
शिवाजीनगर सूर्यामर्फी चौक, कृत्रिम तलाव -१,४८२,
एकूण गणेशमूर्ती जमा - २८,३६२