नोकरीचे आमिष दाखवून आठ तरुणांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:47 AM2021-11-26T01:47:31+5:302021-11-26T01:47:50+5:30
रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून नांदगावच्या आठ तरुणांना १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. हनुमाननगरातील परफेक्ट सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश्वर नथू सूर्यवंशी (मालेगाव), सतीश गुंडू बुच्चे (पुणे), संतोष शंकर पाटील (पुणे) व इतर यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
नाशिक : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून नांदगावच्या आठ तरुणांना १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. हनुमाननगरातील परफेक्ट सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश्वर नथू सूर्यवंशी (मालेगाव), सतीश गुंडू बुच्चे (पुणे), संतोष शंकर पाटील (पुणे) व इतर यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
फसवणूक झालेले तरुण गेल्या दोन महिन्यांत पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक व नांदगाव पोलीस यांच्याकडे चकरा मारत आहेत. स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्याला तरुण बळी पडत गेले. हा प्रकार चार वर्षांपूर्वी घडला. स्पर्धा परीक्षा देण्यापेक्षा रेल्वेत तिकीट तपासनीस, गेटमन अशा पदावरच्या नोकऱ्या ओळखीमधून मिळवून देतो. आपल्या वागणुकीने ज्ञानेश्वरने या तरुणांचा विश्वास संपादन केलेला असल्याने नोकरी मिळण्याच्या आशेने ते ज्ञानेश्वर व त्याच्या साथीदारांनी बनवलेल्या जाळ्यात अडकत गेले. प्रत्येकाकडून १२ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंत रकमा नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने वैयक्तिक भेटीत घेतल्या. तत्पूर्वी रेल्वे भरतीची जाहिरात आली नाही याकडे तरुणांनी लक्ष वेधले असता त्याने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांच्या कोठ्यातील जागा आहेत. माझ्या भरवशावर पैसे द्या. तुमचे पैसे बुडणार नाहीत. तसे झाले तर माझी जमीन, मालमत्ता विकून तुमचे पैसे परत करीन, अशी बतावणी केल्याने सर्वांनी ज्ञानेश्वरवर विश्वास ठेवला. काही रक्कम आरटीजीएसने संबंधित खात्यावर जमा केल्यानंतर पुण्याचा सतीश बुच्चे नांदगाव येथे येऊन अर्ज घेऊन गेला. सर्वांना मुंबई येथील भायखळा रेल्वे हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल व दिल्ली येथील राणी मुखर्जी हॉस्पिटल येथे नोकरीपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले. या कृतीमुळे आणखी विश्वास बसला. त्याचा गैरफायदा घेऊन वरील संशयितांनी पुन्हा राहिलेल्या रकमा रोख स्वरूपात व काहींनी आरटीजीएसद्वारे जमा केल्या.
----------------------
उत्तर प्रदेशात प्रशिक्षणाचा बहाणा
तीन महिन्यांनंतर सर्वांना उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. तेथे ३ महिने प्रशिक्षण देण्याचा बहाणा केला. त्यानंतर नोकरीवर रुजू होण्यासाठी कॉल लेटर पाठविले, सदरचे कॉल लेटर घेऊन वाराणशी येथे रुजू होण्यासाठी जात असताना मध्येच कॉल करून रेल्वे मंडल, दिल्ली येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर आधीचे लेटर चुकीचे असून, नवीन कॉल लेटर मिळेल, असे सांगण्यात आले. या घटना क्रमात संबंधितांना अशा प्रकारे रेल्वे भरती करता येत नाही, अशी माहिती मिळाल्याने तरुणांच्या अंगावर वीज पडावी, असे झाले. रक्कम परत मागण्यासाठी मालेगाव येथे ज्ञानेश्वरच्या घरी गेले असता त्यांना बायकोच्या अंगावर हात टाकला, बलात्काराचा प्रयत्न केला अशा केसेस टाकीन, अशा धमक्या मिळाल्याने तरुणांनी पोलीस स्टेशनचा मार्ग धरला.