१६-१७ फेब्रुवारीला ‘गंधर्व महोत्सव’
By admin | Published: January 28, 2015 11:07 PM2015-01-28T23:07:14+5:302015-01-28T23:07:31+5:30
संस्कृती वैभवच्या वतीने आयोजन : स्थानिक कलावंतांसाठी नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायनाची स्पर्धा
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या संस्कृती वैभव संस्थेच्या वतीने येत्या १६ व १७ फेब्रुवारीला नाशिकमध्ये ‘गंधर्व महोत्सव-२०१५’ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्कृती वैभवच्या वतीने नंदन दीक्षित यांनी दिली.
विशेष म्हणजे, या गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमधील संगीत क्षेत्रातील कलावंतांसाठी नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायन स्पर्धेचे ८ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. गंधर्व महोत्सवाचे उद्घाटन १६ फेबु्रवारीला होणार आहे. त्यानंतर संगीत स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषण वितरण करण्यात येईल. गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक आनंद भाटे, कौशल इनामदार, आदित्य ओक, चैतन्य कुंटे, राजीव परांजपे व सत्यशील देशपांडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच १७ फेब्रुवारीला संस्कृती वैभव पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. त्याचवेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे संगीत/ वादन सादरीकरण करण्यात येईल. बालगंधर्व चित्रपट तयार करतानाचे अनुभव याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, त्यात अभिनेता सुबोध भावे, गायक आनंद भाटे, कौशल इनामदार, आदित्य ओक, विभावरी देशपांडे, नितीन देसाई व रवि जाधव आदि सहभागी होतील.
हे कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृहात होतील, तर ‘संस्कृती वैभव’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय नाट्यसंगीत व सुगमसंगीत गायन स्पर्धा ८ फेबु्रवारीला एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात होतील. त्यासाठी प्रवेश अर्ज करण्याची अंमित मुदत ३ व ४ फेबु्रवारीपर्यंत आहे.
प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येतील. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र व पासेस विनामूल्य देण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी पी.एस. कुलकर्णी, सुप्रिया देवघरे, किशोरी किणीकर, आशिष रानडे, अॅड. अजय निकम, महेश मिसाळ, डॉ.अरविंद पाठक आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)