इंधन दरवाढीविरोधात गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:29 PM2020-07-01T23:29:49+5:302020-07-02T00:29:19+5:30
एकही भूल कमल का फूल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
नाशिक : एकही भूल कमल का फूल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबकनाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमितपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गुलाबपुष्प’ देऊन गांधीगिरी केली.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले. पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली.
आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड,
पुरुषोत्तम कडलग, डॉ. योगेश गोसावी, नंदकुमार कदम, विजय पवार, भास्कर भगरे, विलास सानप, संदीप अहिरे, भूषण शिंदे, गणेश गायधनी
यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.