जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देत केली गांधीगिरी
By admin | Published: July 8, 2017 12:09 AM2017-07-08T00:09:38+5:302017-07-08T00:09:54+5:30
नाशिक : पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केवळ दीड लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न करता पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्णातील पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
दुपारी कालिदास कलामंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शालिमार, शिवाजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत नंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी करीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे साकडे घातले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा. तसेच पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट कर्जमाफी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी २००८-०९ पासून हाताला काही काम नसल्याने पॉलिहाउस व शेडनेटची निर्मिती केली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; मात्र फयानसारख्या वादळामुळे अनेक पॉलिहाउस व शेडनेट उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले. पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाणी व वीज उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्णातून हवाई शेतमाल वाहतूक व वातानुकूलित रेल्वे वाहतूक सुरू करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश होता.