गांधीहत्त्या : दोन्ही बाजू मांडणारे नाटक
By admin | Published: January 18, 2017 12:12 AM2017-01-18T00:12:18+5:302017-01-18T00:12:34+5:30
नाट्यमहोत्सव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
नाशिक : गांधीहत्त्या हा सर्वांचा चर्चेचा विषय आहे. प्रत्येक जण तो आपापल्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गांधी हत्त्येसंदर्भात महात्मा गांधीजी आणि नथुराम गोडसे या दोन्ही घटकांची भूमिका आहे. हे म्हणणे मांडण्याचा दोन्ही बाजू समतोलपणे सादर करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘गांधीहत्त्या आणि मी’ हे नाटक. महाकवी कालिदास कलामंदिर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६४व्या नाट्यमहोत्सवात सिन्नर येथील कामगार कल्याण मंडळाने अनिल बोरसे निर्मित व महेश डोकफोडे दिग्दर्शित ‘गांधीहत्त्या आणि मी’ नाटक सादर केले. ‘गांधीहत्त्या आणि मी’ नाटकात फक्त कारणेच दाखविली नाहीत तर परिणामांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. गोपाळ गोडसे आणि त्यांची पत्नी सिंधू यांच्यातील संवाद, गांधीजींची प्रार्थनासभा व या सभेत त्यांची झालेली हत्त्या अशा प्रसंगातून नाटक पुढे सरकत जाते. तुरुंगात असताना सावरकरांचे मनोगत, गांधीजींच्या अस्थी सिंधू नदीत विसर्जनासाठी जाणे आणि त्याला पाकिस्तानातून नकार येणे, निवांतक्षणी कैद्यांचा रंगलेला बुद्धिबळाचा डाव या सर्व प्रसंगांमधून गांधीहत्त्येमागील वास्तव या नाटकात दाखविले आहे. नेपथ्य- सुनील परमार, पार्श्वसंगीत- तेजस बिल्दीकर, रंगभूषा - माणिक कानडे, प्रकाश योजना- ईश्वर जगताप, वेशभूषा - प्राजक्ता लेले यांनी केली होती. नाटकात छोट्या - मोठ्या भूमिकेत १६ कलाकारांचा सहभाग होता. यावेळी मोजकेच नाट्यरसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)