उपनगर नाक्यावर मनसेची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2016 11:09 PM2016-02-09T23:09:30+5:302016-02-09T23:14:31+5:30
बसस्थांबा ठरतोय अडथळा : वाहतुकीची कोंडी, अपघाताला निमंत्रण
उपनगर : उपनगर नाका चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले बसथांबा शेड हे वाहतुकीला अडथळा व धोकेदायक ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बसथांबा शेडचे स्थलांतर व्हावे यासाठी आरती करत साकडे घातले.
उपनगर नाका येथे काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेलगतच नाशिक-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्त्याला लागूनच बसथांबा शेड आहे. त्यामुळे सिग्नल सुटल्यावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होते.
मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी उपनगर बसथांबा शेडला फुलाच्या माळांनी सजविले. त्यानंतर सर्वांनी बसथांबा शेडचे स्थलांतर व्हावे म्हणून आरती करून साकडे घातले. यावेळी राहुल ढिकले, विक्रम खरोटे, प्रकाश कोरडे, उमेश भोई, अतुल धोंगडे, राहुल ढिकले, किशोर जाचक, रोहन देशपांडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)