गांधीनगरला दुर्गापूजा सुरू
By admin | Published: October 20, 2015 09:56 PM2015-10-20T21:56:05+5:302015-10-20T21:57:53+5:30
गांधीनगरला दुर्गापूजा सुरू
उपनगर : गांधीनगर येथे बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा महोत्सवास नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
गांधीनगर येथे नाशिक सारबोजनीन दुर्गापूजा समितीच्या वतीने गेल्या ६१ वर्षांपासून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून दुर्गापूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी नवरात्रीच्या सहाव्या माळेला रात्री ८ वाजता बंगाली बांधवांच्या हस्ते श्री दुर्गा मातेची विधिवत पूजा-अर्चना करून स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधीनगर मुद्रणालयाचे प्रबंधक आनंदकुमार सक्सेना, संदीप जैन, डॉ. के. के. बच्छाव, राजेंद्र सिंग, कामगार नेते विजय वाघेले, मनोहर बोराडे, दीपक घोष, बिरुदास गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या दुर्गापूजा महोत्सवात पुष्पांजली, अधिबास, बरनपूजा, संधीपूजा, दाधीकर्मा, अपराजितापूजा, बलिदान तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस, चित्रकला, अंताक्षरी, धून आदि सांस्कृतिक स्पर्धांसह आर. डी. बर्मन यांच्या संगीत मैफलीचा कार्यक्रम व संगीनी ग्रुपच्या वतीने विविध नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या दुर्गापूजा महोत्सवास शहराच्या विविध भागातून बंगाली बांधवांबरोबर इतर समाजाचे लोकदेखील मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. (वार्ताहर)