राष्ट्रवादीकडून शहरात औेषध फवारणीची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 03:23 PM2018-09-27T15:23:22+5:302018-09-27T15:28:54+5:30
नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाशिक शहरात औषध फवारणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात गुरुवारी जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळ्यापासून करण्यात आली.
नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. साथीच्या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेची उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत असून, शहरात काही ठिकाणी दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. या दूषित पिण्याच्या पाण्यामुळेही मलेरियाच्या आजारात वाढ होत आहे. गोदावरी नदीतील सांडपाण्यामुळे मध्य नाशिक व नाशिकरोड विभागात डास व किड्यांचे प्रमाण वाढत आहे. मनपाचे कर्मचारी औषध फवारणी करत नसल्याने महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात जेलरोडपासून करण्यात आली असून, त्यानंतर मध्य नाशिक व टप्प्याटप्प्याने शहरातील अन्य भागात ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी अॅड. चिन्मय गाढे, राहुल तुपे, गौतम पगारे, बबलू खेलूकर, निखिल भागवत, संतोष पुंड, रोहित जाधव, राज रंधावा, प्रकाश भोर, स्वप्नील सोनवणे, गणेश गांगुर्डे, संदेश दोंदे, राजेंद्र पाळदे, सुमित औचिते, सनी सुरवाडे, सुशील शिंदे आदी उपस्थित होते.