गांधीजींची वैद्यकीय दृष्टीदेखील महान: आशिष सातव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 10:50 PM2019-10-20T22:50:28+5:302019-10-21T00:29:12+5:30
महात्मा गांधी यांचा जीवनाकडील दृष्टिकोन वैद्यकीयदृष्ट्या शास्त्रोक्त आणि क्रांतिकारी होता, असे प्रतिपादन मेळघाटातील आदिवासींसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जीवन समर्पित केलेले डॉ. आशिष सातव यांनी केले.
नाशिक : महात्मा गांधी यांचा जीवनाकडील दृष्टिकोन वैद्यकीयदृष्ट्या शास्त्रोक्त आणि क्रांतिकारी होता, असे प्रतिपादन मेळघाटातील आदिवासींसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जीवन समर्पित केलेले डॉ. आशिष सातव यांनी केले.
सावानाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी विचारमालेचा डॉ. सातव यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना, गांधीजी यांच्याकडे मी शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून पाहतो, तेव्हादेखील ते मला आदर्श वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात शरीरश्रम नसल्यामुळेच अनेक आजार बळावत असल्याचे दिसून येते, असे डॉ. सातव यांनी नमूद करत गांधीजींनी निर्भय बनण्याचा संदेश देऊन संपूर्ण समाजात निर्भयता आणण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय स्वदेशी, नैसर्गिक शेती असे त्यांचे सगळे दृष्टिकोन हे निरामयी आरोग्याच्या दृष्टीने क्रांतिकारी असल्याचेही डॉ. सातव यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मो. स. गोसावी यांनी गांधीजींचे संपूर्ण विश्वातील स्थान आणि कार्याचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, किशोर पाठक, वसंत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन, तर कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. आभार अॅड. भानुदास शौचे यांनी मानले.