गणेश अहिरेंच्या अडचणीत वाढ
By admin | Published: March 9, 2017 01:34 AM2017-03-09T01:34:50+5:302017-03-09T01:35:03+5:30
नाशिक : पठावे दिगर गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
नाशिक : पठावे दिगर गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आधी त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आणि नंतर ते दबावाखाली स्वीकारल्याचे सांगून आपण अपक्षच असल्याचे दिलेले प्रतिज्ञापत्रावरील निकाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राखीव ठेवला आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक २१ मार्च रोजी होत असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने जर गणेश अहिरे यांना सहयोगी सदस्य म्हणून अमुक एका पक्षाला मतदान करण्याचा व्हीप बजावला तर गणेश अहिरेंची गोची होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या कचाट्यात गणेश अहिरे सापडले आहेत.
गणेश अहिरे यांना आदिवासी क्रांती संघटनेने पुरस्कृत करीत अपक्ष म्हणून निवडून आणल्याचा दावा केला होता. मात्र एका शिक्षण संस्थेचे शिक्षक असलेले गणेश अहिरे यांनी लगोलग राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने त्यांची आदिवासी विकास आघाडीच्या नेत्यांनी गणेश अहिरे यांना याबाबत जाब विचारला होता. त्यामुळे काहीशी नरमाईची भूमिका घेत अपक्ष जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांनी लगेचच दोन दिवसानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करीत, आपण दबावाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले असून, आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून, आपल्याला कोणत्याही संघटनेचा मसुदा लागू होत नसल्याचे कळविले होते. जिल्हा प्रशासनाने मात्र यावर सावध भूमिका घेत अद्याप गणेश अहिरे यांच्या अर्जावर निकाल दिलेला नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबत मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र मार्गदर्शन २१ मार्चच्या आत आले तर ठीक आहे अन्यथा गणेश अहिरेंना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्या पक्षाने बजावलेल्या व्हीपनुसार मतदान करावे लागेल, अन्यथा त्यांचे जिल्हा परिषद सदस्यपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)